मुंबई :- महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, नवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्प, आयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी करणे आणि अशा प्रकल्पांना निधी देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, भिवंडी महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका या प्रमुख प्रकल्पांमध्ये पीएमएवाय आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी महाप्रित करत आहे. मुंबईत सुमारे 56 एसआरए प्रकल्प महाप्रित राबविणार आहे. एमएमआर आणि विशेषतः मुंबई शहरातील विविध खाजगी सहकारी गृहसंकुल संस्थांनी त्यांच्या परिसराचा पुनर्विकासासाठी महाप्रितसोबत चर्चा केली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई शहरातील गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्याकरिता महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत.
महाप्रित ईएसजी अनुपालन, स्वच्छ आणि हरित ऊर्जा निकषांचा अवलंब, कचरा पुनर्वापर, डीकार्बोनाइज्ड साहित्य, नवीनतम आणि पर्यावरणपुरक लवचिक बांधकाम तंत्रज्ञान, राष्ट्रीय पर्यावरणपूरक मानके, राज्यातील दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रकल्प देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय मानके यावर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता महाप्रित कंपनी अग्रस्थानी आहे. तसेच महाप्रित आणि एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडची तज्ज्ञता व कौशल्यामुळे होणारे फायदे लक्षात घेता, दोन्ही सरकारी संस्थांनी समान हितांच्या प्रकल्पांवर पीएमसी अथवा ईपीसी तत्वावर प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.
यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी म्हणाले, एनबीसीसी आणि महाप्रित यांच्यातील सहकार्यामुळे पुनर्विकास कार्य करण्यास मदत होईल व गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच केंद्र सरकारच्या संस्थांना विकासकांची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होत असल्यामुळे, पुनर्विकासांची कामे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.
एनबीसीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी म्हणाले, एनबीसीसी (इंडिया) मुंबई आणि महाप्रित यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मुंबई व मुंबई परिसरातील पुनर्विकासांची प्रकल्प राबविण्यात येतील. तसेच अशाच प्रकारचे प्रकल्प नवी दिल्ली व इतर राज्यांमध्ये संयुक्तपणे राबविण्यात येतील.
यावेळी महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक सुभाष नागे, प्रकल्प संचालक पी. आर.के. मुर्ती, कार्यकारी संचालक सुनील पोटे तसेच एनबीसीसी (इंडिया) नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रदिप शर्मा, कार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे व इतर अधिकारी उपस्थित होते.