नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने शहरातील २०० ठिकाणी ४०० स्मार्ट बिन लावण्यात येणार आहेत. यापैकी विविध १७५ हून अधिक ठिकाणी जवळपास ३५० पेक्षा अधिक स्मार्ट बिन लावण्यात आले आहेत. या अत्याधुनिक बिनची क्षमता ११०० लिटरची आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीला स्मार्ट बिन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले की, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करता यावे याकरिता स्मार्ट सिटीतर्फे स्मार्ट बिन लावण्यात आले आहेत. एका ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करता यावा याकरिता दोन स्मार्ट बिन लावण्यात आले आहेत. नागरिक या दोन्ही स्मार्ट बिनचा वापर करून यात ओला आणि सुका कचरा योग्यरित्या टाकू शकतात.
मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरद्वारे या स्मार्ट बिनवर निगराणी ठेवण्यात येत आहे. या अत्याधुनिक बिनमध्ये GSM आणि RFID वर आधारित सेन्सर लावण्यात आले आहेत. या स्मार्ट बिन मध्ये ८० टक्के कचरा जमा झाल्यानंतर सेन्सरच्या माध्यमातून एक सूचना थेट सिटी ऑपरेशन सेंटरला प्राप्त होणार असून, त्यामुळे कचऱ्याची योग्य प्रमाणे विल्हेवाट लावण्यात येईल.
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ब्लॅक स्पॉटचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार ज्या ठिकाणी नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात त्या ठिकाणी कचरा कुंडी लावण्यात आली आहे. या कचरा कुंड्या लावल्याने नागरिक या स्मार्ट बिन मध्ये कचरा टाकतील आणि नागरिकांना सुविधा प्राप्त होईल.