सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात प्रशासनाकडून यावर्षी आधुनिक सुविधा

– दीक्षाभूमी इन्फो डॉट इन संकेतस्थळावर सर्व माहिती

– पुढील 3 दिवस आरोग्य तपासणीसाठी 24 तास सुविधा

– पोलिस, अग्निशमन दल ठिकठिकाणी तैनात

– पिण्याचे पाणी, शौचालय, तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

नागपूर :- दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा देण्यासाठी जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने यावर्षी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 100 डॅाक्टर 24 तास उपलब्ध असून चार हजार पोलिस मदतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय महानगरपालिकेने ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड लावून सुविधांची माहिती उपलब्ध केली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी, तात्पुरता निवारा रस्त्यावरची स्वच्छता यासाठी हजार कर्मचारी पुढील तीन दिवस दिवसरात्र काम करणार आहेत.

दीक्षाभूमीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येणार असल्याची शक्यता परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने वर्तवली आहे. एक दिवसाआधीच यावर्षी हजारो बांधव दर्शनासाठी दीक्षाभूमीवर पोहोचले आहेत. उद्या ही संख्या वाढण्याची शक्यता असून आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोन तास दीक्षाभूमी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी महानगर पालिकेसोबत पूरक व्यवस्था म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आरोग्य शिबिराचे अधिकृत उदघाटन केले. याठिकाणी 24 तास तज्ज्ञ डॅाक्टर उपलब्ध राहणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील डॅाक्टर, निवासी डॅाक्टर यांची यासाठी तैनाती करण्यात आली आहे. याठिकाणी गंभीर रुग्णांपासून सर्वसामान्य आजारांपर्यंत उपचार, औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरित्या यावर्षी सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट दीक्षाभूमी इन्फो डॉट इन हे विशेष संकेतस्थळ सुरू केले असून सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा कुठे उपलब्ध आहे याची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. नागरिकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये माहितीदर्शक नकाशादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. डिजिटल बोर्डद्वारे अनुयायांना सर्व सूचना देणे सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्ष उघडला असून दीक्षाभूमीवर असणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधांमध्ये अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठिकठिकाणी पुस्तकांचे स्टॅाल दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आले आहेत. यात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील स्टॅाल या ठिकाणी पहायला मिळतात. वाचकांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झाली असल्याचे पहायला मिळते.

स्वच्छतेची चांगल्या प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी स्वच्छता दूत तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जागोजागी नळ बसविण्यात आले आहेत. परिवहन व्यवस्थेचीही काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येत आहे. यासाठी विशेष बसेसची व्यवस्था वाहतूक विभागाने नेमून दिलेल्या ठिकाणापर्यंत करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

उद्या सायंकाळी सहा वाजता दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई असतील. तर प्रमुख अतिथी श्रीलंका येथील रेव्ह. डब्ल्यू. धम्मरत्न थेरो असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

दीक्षाभूमीवर प्लास्टिक फ्री झोन पाळण्याचे आवाहन

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन हा कायम परिवर्तनाचा दिशादर्शक उत्सव राहिला आहे. हा उत्सव यापुढे ‘प्लास्टिक फ्री झोन’ उपक्रम ठरावा. पिण्याचे पाणी, खानपान, अन्नदान, शौचालय अन्य कोणत्याही कामासाठी प्लास्टिकचा वापर कोणीच करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘नागपूर नशामुक्त’ मोहीम राबविणार – डॉ.विपीन इटनकर

Mon Oct 23 , 2023
नागपूर :- आजची पिढी मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘नागपूर नशामुक्त ’मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. नार्को कोऑर्डिनशन सेंटरबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विजय माहूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com