– अधिकाऱ्यांना दिल्या आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना
वरूड :- वरूड तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतपिकांसह घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले. आमदार देवेंद्र भुयार यांनी शेघाट, मलकापूर, पिंपळशेंडा, येथे अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून आपत्तीग्रस्तांना धीर देत अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईबाबतच्या सूचना केल्या.
वरूड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वरूड तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ झाले. वादळाने झाडे उन्मळून पडली तसेच काही ठिकाणी विजेचे खांब पडले. घरांची पडझड झाली, वादळी पावसाने अनेक ठिकाणी संत्रा बागा तसेच शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
आमदार देवेंद्र भुयार यांनी शेघाट, मलकापूर, पिंपळशेंडा, यासह तालुक्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले, त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. अनेकांचे संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही आमदार देवेंद्र भुयार यांनी मदतीचे आश्वासन देत धीर दिला. यावेळी शेघाट, मलकापूर, पिंपळशेंडा, येथील नागरिक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.