– हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर आमदार अडबाले यांनी केली चर्चा
नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.
आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी व शेतमजुरांचा वन्यप्राण्यांमुळे बळी जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तींचा हैदोस सुरू आहे. जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप पुरेशा प्रमाणात देण्याची गरज आहे. जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असेल तर पिक कव्हर इन्शुरन्स देण्याची व्यवस्था करावी.
विदर्भामध्ये विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांमुळे प्रदूषण होत आहे. प्रदूषणामुळे पिकांचे आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांनी चंद्रपुरकरांना ग्रासले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणीही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्यामुळे जलसाठा खोली वाढली आहे. विहिरी किंवा बोरिंगचे पाणी खाेलवर गेले आहे. वर्धा नदीवर शेतकऱ्यांच्या सिंचन दृष्टीने बॅरेजेस बांधण्याची गरज आहे.
विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगार पूणे-मुंबईला जातात. विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कापूस आणि सोयाबीन हे विदर्भाचे मुख्य पीक आहेत. या पिकांच्या भावात स्थिरता आणण्याची गरज आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही. रेल्वे कशी पोहोचेल, यादृष्टीने शासनाने पाऊले उचलावीत. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे. जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल व इतर विदर्भ विकासाच्या बाबींकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्ष वेधले.