मिशन पुना आकी’ संपन्न,जन्म दाखला-आधार कार्ड कॅम्पचा अनेकांना लाभ

गडचिरोली :- पंचायत समिती भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी सुरवात’ ही मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेअंतर्गत भामरागड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जून महिन्यात एक दिवसीय शिबिराच्या आयोजनातून आधार कार्ड, जन्म दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बॅंक अकाऊंट अशी महत्वाची कागदपत्रे ग्रामस्थांना गावातच उपलब्ध करून दिली गेली. तसेच महत्वपूर्ण योजनांचा लाभ व माडिया भाषेतून पथनाट्य सादर करीत महिला आरोग्य व अधिकार यावर प्रबोधन केले गेले.

भामरागड मधील बहुतांश लोकांच्या आधार व जन्म दाखल्याच्या समस्या असल्याने विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना अडचणी येतात. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याच्या फेऱ्या मारणे शक्य नसल्याने लोक टाळाटाळ करतात. परिणामी बरेच लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच भामरागड तालुक्यातील महिला आरोग्याशी संबंधित मासिक पाळी स्वच्छता, कुमारी माता/बालविवाह व संस्थात्मक प्रसूती हे विषय देखील गंभीर आहेत. या समस्या ओळखून पंचायत समिती भामरागड तर्फे ही मोहीम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात व गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली गेली.

मोहीमेची उपलब्धी :

मोहिमेदरम्यान जन्म नोंदणी उपलब्ध नसलेले एकूण 2820 दाखले दिले. फिरत्या आरोग्य तपासणी पथकाने 1998 जणांची तपासणी केली. यावेळी गर्भवतींचे व लहान बालकांचे लसीकरण देखील केले गेले. माता व बालकांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या बालसंगोपन, जननी सुरक्षा व प्रधानमंत्री मातृत्ववंदना योजनांची माहिती देत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. आधार कार्ड संबंधित लाभ 1589 लाभार्थ्यांनी घेतला. यापैकी 311 नवीन आधार कार्ड काढणारे लाभार्थी होते. इंडियन पोस्ट बँक व महाराष्ट्र बँकेचे 201 जणांनी अकाऊंट काढले. ग्रामसेवकांकडून विवाह नोंद प्रमाणपत्र दिले गेले. काही शिबीरात बँकेकडून अपघाती विमा, पिक विमा, पॅन कार्ड, आभा व आयुष्यमान कार्ड यावेळी काढून देण्यात आले.

महिलांच्या अधिकारासाठी ‘आस्कना अधिकार, विजय किकाल!’ या पथनाट्याचे सादरीकरण

यावेळी भामरागड मधील तरुण कलाकारांनी माडिया भाषेतून महिला आरोग्य व अधिकारांविषयी पथनाट्य सादर केले. मासिक पाळी स्वच्छता याविषयी माहितीच्या अभाव व पाळीतील महिलांना अनेक नियम पाळावे लागत असल्याने त्याचा थेट प्रभाव महिलेच्या आरोग्यावर होतो. कुमारी माता/ बालविवाहाच्या समस्येमुळे कुपोषित मुले, माता मृत्यू या अडचणींसोबत विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकत नाही. संस्थात्मक प्रसूती देखील यासाठी महत्त्वाची आहे. शिवाय नवजात बालकासोबत आईला घराबाजूच्या चाप्यात कमी सुविधांमध्ये आठवडाभर राहावं लागत असल्याने दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो. या सर्व महत्त्वाच्या व गंभीर मुद्द्यांवर या पथनाट्यातून जनजागृती करण्याचे काम कलाकार करीत आहेत.

‘मिशन पुना आकी’ ही मोहीम २ जून ते २९ जून दरम्यान धोडराज, मल्लमपोडूर, विसामुंडी, बिनागुंडा, नेलगुंडा, गोंगवाडा, हालोदंडी, कोठी, होड्री, लाहेरी, येचली, मन्नेराजाराम, मडवेली, जिंजगाव, इरकडुम्मे, नारगुंडा, टेकला व आरेवाडा या गावांमध्ये पार पडली.

“ही मोहीम जरी पार पडली असली तरी उर्वरित लाभार्थ्यांना देखील लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. लाभार्थ्यांचे जुने हस्तलिखित जन्मदाखले जमा केलेले असून ऑनलाइन करून दिले जात आहेत. जन्म नोंद नसलेल्या लाभार्थ्यांना जन्म दाखले या महिन्यात मिळवून देण्यासाठी मिशन मोडवर काम चालू आहे.”

– स्वप्निल मगदूम, गटविकास अधिकारी भामरागड

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतचे कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक, आकांक्षीत तालुका फेलो, आरोग्य तपासणी पथक, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मोबिलायझर व पथनाट्यातील कलाकार या सर्वांनी महत्वाची कामगिरी बजावली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामीण रस्त्यांसाठी ग्रामविकास व वन विभागाची संयुक्त बैठक घेणार - मंत्री गिरीश महाजन

Fri Jul 12 , 2024
मुंबई :- ग्रामविकास विभागांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी काही ठिकाणी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील रस्ते तयार होण्यास विलंब होतो. यासाठी या रस्त्यांच्या कामांमधील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि वनविभाग यांच्याशी सकारात्मक चर्चा करणार. रस्ते निर्मितीच्या कामास गती देणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com