मुंबई :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून महिला व बालविकास मंत्री म्हणून मला आनंद आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शन १४ ऑगस्टपर्यत असून ठाणे, चंद्रपूर, सातारा, सांगली, पुणे, जालना, नाशिक, रायगड, पालघर, कोल्हापूर या दहा जिल्ह्यामधील महिला बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
या प्रदर्शनात महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले हस्त निर्मित राखी, पर्स, खाद्यपदार्थ, वारली पेंटिंग कोल्हापूरी चप्पल, घरगुती सरबत, तोरण, फुलांच्या माळा, बांबूपासून आकर्षित शोभेच्या वस्तू इत्यादी उत्पादीत वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.