संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता स्वर्गीय राकेशकुमारजी पोरवाल यांचा स्मृतिदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोककुमार भाटिया, डायरेक्टर डेव्हलपमेंट एस. पी. एम. हे उपस्थित होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्चित चांडक, आय. पी. एस, डी. सी. पी. (ईओडब्ल्यू एंड साइबर क्राईम )नागपूर शहर हे उपस्थित होते.
ह्या स्मृती दिवसाच्या सोहळ्यासाठी एस.पी.एम. संस्थेचे सचिव विजयकुमार शर्मा , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. विनय चव्हाण,प्रमुख पाहुण्यामध्ये अखिल पोरवाल, अभिमन्यू पोरवाल, ऐश्वर्य पोरवाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुधाकर धोंडगे आणि डॉ. अनिल मंगतानी,उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, डॉ. सुधीर अग्रवाल, विश्वनाथ वंजारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. विनय चव्हाण यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणांमधून स्वर्गीय राकेश कुमारजी पोरवाल यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण कशापद्धतीने करता येईल. यासाठी पोरवाल महाविद्यालय सदैव प्रयत्नशील आहे असे सांगितले. पोरवाल महाविद्यालयामध्ये दरवर्षी स्वर्गीय राकेशजी पोरवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरामध्ये बरेचसे विद्यार्थी आणि रक्तदाते रक्तदान करून समाजाप्रती असणारे आपले उत्तरदायित्व सिद्ध करीत असते असे सांगितले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्चित चांडक यांनी आपल्या भाषणामध्ये संबोधित करताना म्हटले की, रक्तदान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. भारतात अजूनही असे लोक आहेत ज्यांना रक्ताची खूप गरज आहे. तुमच्या रक्तदानामुळे दुसऱ्यांचे जीवन वाचू शकते असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, शिक्षण हे आपले आयुष्य घडवीत असते. आपल्या जीवनात बदल करीत असते. आम्ही सुद्धा या शिक्षणामुळेच घडलो. पण विद्यार्थ्यांनी अपयश पचवायची ताकद सुद्धा आपल्यामध्ये ठेवायला पाहिजे तरच तुमच्या हातात यश आल्याशिवाय राहणार नाही. असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शेवटी त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालो की हार नही होती’ या ओळी सांगून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
त्यानंतर डॉ. रेणुका रॉय यांनी महाविद्यालयातर्फे प्रकाशित होणारे केसरी वार्षिकांक यांचे विमोचन करण्यासाठी सर्व पाहुण्यांना आमंत्रित केले. केसरी वार्षिकांकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांनी केले. यानंतर श्री.अशोककुमारजी भाटिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वर्गीय राकेशकुमारजी पोरवाल यांची महाविद्यालयाप्रति असणारी तळमळ या ठिकाणी बोलून दाखवली. त्यांनी महाविद्यालयात नवनवीन योजना राबवण्याचे काम आपल्या कार्यकाळात केले होते असे सांगितले. आजही त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य महाविद्यालय पूर्ण करीत आहे अशी ग्वाही दिली.
ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ.गजाला हाश्मी यांनी केले.तर कार्यक्रमाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती यांनी आभार प्रदर्शन केले.एस.पी.एम. संस्थेचे पदाधिकारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी भरगच्च संख्येने उपस्थित होते.