– थ्री R रिड्युस, रियूज व रिसायकल वर दिला जाणार भर
– अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले मार्गदर्शन
नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गट स्थापित करण्यात आले आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या महिला बचत गटांची बैठक घेण्यात आली. नागपूर शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी थ्री R रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर देण्यात यावा असे मार्गदर्शन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीत मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले , उपायुक्त प्रकाश वराडे , समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त किरण बगडे, हुमने , राऊत यांच्यासह स्वच्छ भारत मिशन नागपूर व DAY-NULM चे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके ,प्लास्टीक, कपडे,पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी ” रिडयुस,रियुज आणि रिसायकल करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून केंद्र तयार करावे असे निर्देश दिले. तसेच येत्या 20 मे 2023 ते 5 जून 2023 पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून हे केंद्र सुरू करावे, याशिवाय या केंद्रांकरिता त्वरित झोन स्तरावर जागा निश्चित करण्यात यावी बाबतच्या सूचना देखील राम जोशी यांनी दिल्या.
सदर RRR केंद्र स्थापन करून नागरिकांद्वारे गोळा करण्यात आलेल्या वस्तूंचे नूतनीकरण करणे तसेच नव नवीन उत्पादने तयार तयार करण्यास प्रोत्साहित करणे हा यामागील उद्देश असून महिला बचत गटांनी अशा प्रकारचे केंद्र सुरू करून स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी जोशी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कार्यात पं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत स्थापित महिला बचत गटांमार्फत नागरीकांना ओलाकचरा तसेच सुकाकचरा वेगवेगळा संकलित करून तो तसाच वेगवेगळा कचरा गाडीमध्ये टाकला जाईल याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.