दोन आठवडे विविध स्पर्धा व जनजागृती अभियान
नागपूर : केंद्र शासन, महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार २१ मार्च ते ४ एप्रील २०२२ पर्यंत नागपूरसह संपूर्ण देशात पोषण पखवाडाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण व आढावा समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
पोषण पखवाड्याच्या पहिल्या आठवड्यात दिनांक २१ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा अभियानाचे आयोजन करणे तसेच २८ मार्च ते ४ एप्रील २०२२ या कालावधीत केंद्र शासनाने निश्चित करुन दिलेल्या जेंडर सेन्सिटिव्ह वॉटर मॅनेजमेंट याविषयी जनजागृतीसाठी विशेष उपक्रम घेतले जाईल. तसेच अँनेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापन, आदिवासी क्षेत्रातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ होण्याकरीता स्थानिक व पारंपरिक आहाराचा नियमित भोजनात वापर करण्यासाठी आवाहन करणे अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प यांच्या मदतीने व सेवाभावी संस्था/लायन्स क्लब/रोटरी क्लब/खाजगी हॉस्पिटल/महिला बचतगट/ युवक मंडळ तसेच महानगरपालिका अंतर्गत आरोग्य व शिक्षण विभाग, समाज विकास विभाग, झोनल कार्यालय, बालवाडया, नर्सरी शाळा इत्यादीच्या सहभागाने सदर दिवशी विशेष कॅम्पचे आयोजन केले जाईल. सर्व बालकांचे वजन, उंची मोजून त्याची नोंद केंद्रशासनाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर एप मध्ये करण्यात येईल. ज्या बालकांची वजन, उंची मोजलेली नाही अशा बालकांची घरीच वजन, उंची मोजून नोंद करण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल.