मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले
मुंबई :- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार या अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्याचे नियोजन काय ? हे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले नाही याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.