– ‘वरदा’ स्मरणिकेचे प्रकाशन
वर्धा : मराठी ही ज्ञान भाषा असली तरी त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतिमध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबातची चिंता दूर होईल, असा आशावाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालय परिसरात सुरु असलेल्या ९६व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी शुभारंभाच्या सत्रात फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. समीर मेघे, माजी आ. सागर मेघे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्वला मेहेंदळे, विलास मानेकर, गजानन नारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठीमध्ये साहित्य संमेलनाची उज्वल अशी परंपरा आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, विविध विचारांचे साहित्य संमेलने उत्साहात पार पडतात. साहित्य संमेलने हे उणीवांवर बोट ठेवण्यासाठी नव्हे तर जाणीवा समृद्ध करणारे असते. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला असा आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, सकाळी टीव्ही लावल्यावर जे साहित्य राजकारण्यांच्या तोंडून ओसंडून वाहताना दिसते, त्यावरून आम्ही साहित्यिक नाही असे कुणी म्हणू शकत नाहीत. आमच्यातही बरेच साहित्यिक आहेत. आम्हीच साहित्यिकांची प्रेरणा आहोत आणि म्हणून व्यासपीठावर मिळणारी लहानशी जागा सुद्धा आम्ही व्यापून घेतो, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. वर्तमानात नवनिर्मित साहित्याला उंची आणि खोली नाही. मात्र भविष्यात ती मिळेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानीनिमित्त आयोजित ९६व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका ‘वरदा’ चे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रस्ताविक प्रदीप दाते यांनी केले तर संचालन रेणुका देशकर यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाला १० कोटी
– विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपुर्व काळापासून केले आहे. संघाच्या शताब्दीं वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.