नागपुर – ह्या धकाधकीच्या काळात अतिविशिष्ट विचाराच्या समस्या असणार, आधुनिक युगात मनुस्मृतीचे विवेकनिष्ठ समीक्षा आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रो डॉ शैलेंद्र लेंडे यांनी आज केले. भिक्खु महेंद्र कौसल लिखित *मनुस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा या ग्रंथाचे प्रकाशन आज धरमपेठ येथील सर्वोदय आश्रमाच्या सभागृहात पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते.
बुद्ध आणि बाबासाहेब यांची विवेकनिष्ठ विचारधारा जगापुढे येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करीत डॉ शैलेंद्र लेंडे पुढे म्हणाले की मनुस्मृतीचा विचार जो विशिष्ट वर्गांना विशिष्ट प्रगतीच्या संधी बहाल करतो आणि इतरांना त्यापासून दूर लोटतो. त्याची समीक्षा या ग्रंथातून करण्यात आली असून ती आजच्या काळाला अनुरूप अशीच आहे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागेश चौधरी म्हणाले कि मनुस्मृतीचा विचार बहुजनांना गुलामीत लोटणारा विचार आहे. बहुजनांना सामाजिक आणि आर्थिक विकासापासून वंचित करणारा विचार आहे. आजही वेगळ्या स्वरुपात हा विचार लादण्याचा प्रयत्न होत आहे. मनुस्मृतीने पुरस्कार केलेल्या विशिष्ट वर्गाचा अभ्युदय, त्याचा विचार आणि शुद्रांना अवनत करण्याचा विचार याची सुंदर समीक्षा लेखक भि म कौसल यांनी या ग्रंथातून केलेली आहे जी आज सर्वांच्या पुढे जाणे गरजेचे आहे.
या प्रसंगी समता प्रकाशन संस्थेचे संचालक व या पुस्तकाचे प्रकाशक प्रदीप गायकवाड ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. *मनूस्मृतीची बुद्धिवादी समीक्षा* ही दुसरी आवृत्ती असून यापूर्वी 2019 ला प्रकाशीत झालेली प्रथम आवृत्ती संपल्यामुळे काही अधिकची प्रकरणे जोडून ही दुसरी काढण्यात आल्याचे लेखकाने या प्रसंगी जाहीर केले. प्रकुर्ती अस्वस्थतेमुळे डॉ रूपा कुळकर्णी बोधी या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या.
बुद्धिस्ट स्टुडंट असोसिएशन ने आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशन समारोहाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव उत्तम शेवडे यांनी केले. प्रास्ताविक लेखक भिख्खू महेंद्र कौसल यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सखारामजी मंडपे यांनी केला.
कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यात विशेषता आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.