-जिजाऊं व स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन
नागपूर, ता. १२ : बालपणापासून देशासाठी सन्मान आणि समर्पणाची भावना ठेवण्याचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर माँसाहेब जिजाऊंनी केले आहेत. जिजाऊंच्या संस्कारातून, शिकवणीतून शिवाजी महाराज घडले. शिवरायांच्या संपूर्ण जीवन चरित्राच्या निर्मात्या माँसाहेब जिजाऊ आहेत, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संयुक्तरित्या जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये जिजाऊंच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर नंदा जिचकार, जिजाऊ बिग्रेडच्या महिला सदस्य वृंदाताई ठाकरे, मायाताई थोरात, मिनाक्षीताई गतफणे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी राजमाता जिजाऊंच्या संस्कार आणि शिकवणुकीची महती सांगताना शिवरायांच्या बालपणातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशाहाच्या दरबारात काम करायचे. एक दिवस १२ वर्षाचे शिवाजी वडील शहाजी राजेंसोबत आदिलशाहांच्या दरबारात गेले. त्यावेळी शहाजीराजेंनी आदिलशाहांना झुकून मुजरा केला. १२ वर्षांच्या शिवाजींना त्यांनी आदिलशाहांना मुजरा करण्यास सांगितले. त्यावेळी चिमुकल्या शिवबांनी शहाजीराजेंना उत्तर दिले, ‘माझे शिर एक तर देशासाठी झुकेल किंवा देवापुढे झुकेल. मी मुघलांपुढे शिर झुकविणार नाही.’
एक वर्षाचा मुलगा वडील जिथे काम करतात तिथे राष्ट्राप्रति सन्मानित आणि समर्पणच्या भावनेतून हे उत्तर देत असेल तर हे संस्कार लहानपणी आईने दिलेल्या शिकवणीशिवाय येऊ शकत नाही. शिवाजींचे संपूर्ण चरित्र हे जिजाऊंनी निर्माण केलेले चरित्र आहे. जिजाऊंसारखी आई नसती तर शिवराय नसते. शिवरायांच्या जीवनाच्या संपूर्ण रचनाकार जिजाऊ आहेत, असेही महापौरांनी गौरवोद्गार काढले.
शिवाजी घडविण्यासाठी एक कणखर मातृत्व निर्माण होणे आवश्यक आहे. जिजाऊ घडल्याशिवाय शिवाजी निर्माण होऊ शकत नाही, असे मत माजी महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शिवमती देशमुख, सुनिता जिचकार, नंदाताई देशमुख, अनिता ठेंगरे, प्रणाली दळवी, संजीवनी सोमवंशी, नॅश नुसरतअली, नंदा अतकरे, आदी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
यापूर्वी महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ माँ साहेब भोसले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ बुधवारी (ता.१२) रोजी महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति स्थायी समिती सभागृह येथे महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, माजी महापौर नंदाताई जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच महापौर कार्यालयातील राजमाता जिजाऊंच्या तैलचित्राला व सत्तापक्ष येथील स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला मान्यवरांनी पुष्पअर्पण करुन अभिवादन केले.
या प्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, निगम अधिक्षक पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.