मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू; सरकारला दिला इशारा, म्हणाले, “विधानसभेला आम्ही…”

मनोज जरांगे पाटील आज ८ जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ४ जून रोजीच्या उपोषणाच्या तारखेत बदल करत ८ जून रोजी केली होती. त्यानुसार आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असून राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला. “जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ते अंतवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“संपूर्ण मराठा समाजाला माझे आवाहन आहे की, आपण शांततेत राहायचं. आमच्या आंदोलनाविरोधात काही निवेदनं जाणीवपूर्वक देण्यात आले आहेत. मात्र, भविष्यात आम्हीही असे निवेदन देऊ. तुमच्या काही रॅली निघतील. मग त्यावेळी आम्हीही अशा प्रकारचे निवेदन द्यायचे का? महाराष्ट्रात रॅली तुम्ही काढणार असाल तर आम्हालाही रहदारीला त्रास होणार आहे. मग तुम्ही तुमची रॅली रद्द करणार आहात का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली? या प्रश्नावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची मागणी असलेल्या सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी एवढीच आमची मागणी आहे. या मागणीसाठीच मी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहे. तर सरकारला हा कायदा करण्यासाठी काही पुराव्याची गरज लागत असेर तर तब्बल ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, राज्यातील मराठा आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घेऊ. मात्र, एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही. यामध्ये अनेक विषय आहेत. आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशीच आमची मागणी आहे. सरकाच्यावतीने निवेदनं देण्यात आली. मात्र, मी आचारसंहितेचा सन्मान केला. ४ जून रोजीचं उपोषण ८ जून रोजी केलं. आमच्या आंदोलनाच्या विरोधात निवेदन देणारे कोण आहेत? हे सर्वांना माहिती आहेत. मोदींच्या शपथविधीमुळे जनतेला त्रास होणार असेल तर मग शपथविधीचा कार्यक्रण होणार नाही का?”, असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.

“आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं. त्यामुळे पुन्हा परवानगीची आवश्यकता नाही. यावेळी कडक उपोषण करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत आहोत की त्यांनी पुढे येऊन हा विषय मार्गी लावावा. मात्र, ते लक्ष देत नाहीत. आमचं ध्येय मराठा आरक्षण मिळवणं हेच आहे. जर आरक्षण दिलं नाही तर महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही. मग ती तुमची जबाबदारी असेल. भारतीय जनता पक्षातील जेवढे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगावं. अन्यथा विधानसभेला नावं घेऊन पाडणार”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदींच्या शपथविधीच्या दिवशी विमानाच्या घिरट्या बंद, कलम 144 लागू

Sat Jun 8 , 2024
नवी दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएच्या घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन पत्र सुपूर्द केलं. यानंतर आता मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 जूनला मोदींच्या शपथविधीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com