यवतमाळ :- सतत होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो व्हेन मोझॅकचा प्रादुर्भाव आढळुन आलेला आहे. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबिन यलो मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे.
कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. पिवळा मोझॅक या रोगामुळे उत्पादनामध्ये साधारणतः १५ ते ७५ टक्के पर्यंत घट येऊ शकते. सोयाबीनवर दिसणाऱ्या रोगाच्या लक्षणानुसार शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे – सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे किंवा अनियमीत पट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पुर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणु पानातील रसामार्फत पसरतो अणि हा प्रसार पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. उबदार तापमान, अति दाट पेरणी या रोगाच्या वाढीस कारणीभुत ठरते. आद्र हवामानात हा रोग वाढत जातो.
नुकसानीचा प्रकार – पिवळ्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालातंराने फुले अणि शेंगा कमी लागतात, त्यातील दाण्याचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण दाणे विरहीत राहुन पोचट होतात, पर्यायाने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते.
सोयाबीन वरील पांढरी माशी, पिवळा मोझॅक विषाणूचे एकात्मीक व्यवस्थापण – पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेत तणमुक्त ठेवावे. पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे काढुन नष्ट करावी. ५ टक्के निर्बोळी अर्काची फवारणी करावी. बांधावर असणाऱ्या पुरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हेक्टरी १० ते १५ पीवळे चिकट सापळे लावावेत. शिफारशीनुसार सोयाबीन पिकात संतुलीत खत मात्रा द्यावी. अनावश्यक खतांचा वापर टाळावा. प्रमाणापेक्षा जास्त मात्रेत किटकनाशकांचा वापर टाळावा.
पांढऱ्या माशीच्या प्रभावी व्यवस्थापणाकरीता एसीटामीप्रीड २५ टक्के अधिक बायफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यु जी १०० ग्रॅम ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी, असे उपविभागीय कृषि अधिकारी जे.आर.राठोड यांनी कळविले आहे.