– विद्यापीठात अमृतकलश संकलन नियोजन कार्यशाळा
नागपूर :- भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य शहिदांनी बलिदान दिले. त्या शहिदांना वंदन करणे तसेच भूमीला नमन करण्यासाठी सरकारने ‘माझी माती माझा देश’ सुरू केले आहे. या ‘माझी माती माझा देश’ अभियानाला लोकचळवळ बनवूया, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेश पांडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय कक्ष मुंबई, रासेयो कार्यक्रम अधिकारी व कलश संकलन नियोजन कार्यशाळा बुधवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली. यावेळी डॉ. पांडे मार्गदर्शन करीत होते.
यावेळी व्यासपीठावर रासेयो राज्य सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेश पांडे, रासेयो राज्य सल्लागार समिती सदस्य डॉ. सतिश चाफले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी रासेयो संचालक डॉ. संजय चाकणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य वामनराव तुर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अजय चव्हाण, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, अधिसभा सदस्य सर्वश्री डॉ. कुमुद रंजन, नीरज जावडे, शुभांगी नक्षीने, डॉ. किशोर इंगळे, प्रथमेश फुलेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवी मोर उपस्थित होते. डॉ. राजेश पांडे पुढे बोलताना म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली, ज्या मातीसाठी बलिदान दिले. त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण देशात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबवित आहे. देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्ती जागविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. २०४७ मध्ये भारताला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनविण्याचा संकल्प शहिदांना व मातीला वंदन करून करावयाचा असल्याचे डॉ. पांडे म्हणाले. देशातील प्रत्येक गावातून आलेल्या मातीतून दिल्ली येथील कर्तव्य पथावर अमृत वाटिका तयार केली जाणार आहे. ३० ऑक्टोबरला ७५ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाटीकेत वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. या अभियानात विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. संजय चाकणे यांनी अभियानाबाबत माहिती देताना संपूर्ण देशातून ७४ हजार कलश एकत्र केले जाणार असल्याचे सांगितले. पंचप्राण प्रतिज्ञा घेताना त्याची सेल्फी काढून अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवाय कार्यशाळेत सेल्फी कशी काढावी याबाबत त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी माझी माती माझा देश अभियान अंतर्गत वृक्षदिंडी पंचप्राण प्रतिज्ञा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती दिली. सोबतच ‘माझी माती माझा देश’ अभियानात प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन कार्यक्रम अधिकारी यांना केले. अधिसभा सदस्य शुभांगी नक्षीने यांनी डॉ. राजेश पांडे यांचा परिचय करून दिला. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अमृतकलशामध्ये माती टाकून माती प्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.