नागपूर, ता. २१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. १९ भोईपुरा येथे सोमवारी (ता. २१) महर्षी नाथुबाबा चौकाचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले.
कार्यक्रमात नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, माजी नगरसेवक मुन्नालाल गौर, भोई समाज पंच कमेटीचे अध्यक्ष नंदकिशोर गौर, सामाजिक कार्यकर्ता लोकमन गंगोत्री, राजेश कश्यप, किशोर कस्तार, अशोक गौर, हेमेंद्र गौर, अशोक नायक, डॉ. विजय गौर, दिलीप गौर, तुलसीदास गौर, रोहित गौर, मधु गौर, सीताराम गौर, ॲड.राजेश नायक, ॲड. डहानू वलथरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, बजेरिया भागासह संपूर्ण शहरात विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. बजेरिया सारख्या परिसरात वाहतूक कोंडी लक्षात घेता विविध मार्ग तयार करण्यात आले. हे मार्ग तयार करताना जे परिवार बाधित होत होते त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. गीतांजली चौक ते गांधीसागर तलावापर्यंतच्या मार्गामुळे येथील ज्या परिवारांचे घर तुटणार होते त्यांना मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात नवीन घराच्या किल्ल्या देण्यात आल्या. याशिवाय मारवाडी चाळ ते रजवाडा पॅलेस येथील मार्गामुळे तुटणारी ६४ घरे वाचविल्याचेही समाधान असल्याचे महापौर म्हणाले.
बजेरिया भागामध्ये मध्य भारतातील सर्वोत्तम, सर्व सुविधांनी युक्त अशी अटल बिहारी वाजपेयी ई-लायब्ररी तयार झालेली असल्याचीही माहिती यावेळी महापौरांनी दिली.
महर्षी नाथूबाबा यांच्या नावाने बजेरिया भागात चौक असावे अशी भोई समाजबांधवांची मागणी लक्षात घेउन महर्षी नाथूबाबा चौकाच्या नामकरणाचा प्रस्ताव स्वत: ठेवला. मात्र नामकरणाच्या प्रस्तावाला प्रभागाच्या सर्व नगरसेवकांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य दर्शविल्यामुळे हे शक्य झाल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन राहुल यांनी करीत शेवटी सर्वांचे आभारही मानले.