-अध्यक्ष निंबाळकर यांची विविध केंद्रांना भेट
-नागपूर येथील 32 केंद्रांवर 12 हजार विद्यार्थी
-विद्यार्थ्यांनी केले कोविड प्रोटोकॉलचे पालन
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज घेण्यात आलेली राज्यसेवा पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी नागपूर शहरातील केंद्रांना भेट देवून तेथे उभारण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
नागपूर जिल्ह्यात 32 केद्रांवर राज्यसेवा पूर्व परिक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 12 हजार 183 विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेला हजेरी लावली. कोविड प्रोटोकॉलचे संपूर्ण पालन करून आज परिक्षा घेण्यात आल्या. राज्यात 724 केंद्र व 37 जिल्हा केंद्रांवर 2 लाख 55 हजार विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. लेखी परिक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. कोविड काळामुळे वय अधिक्य झालेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी राज्यसेवा पूर्व परिक्षांची मुदत वाढविण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण राज्यात आज एकत्रित लेखी परिक्षा घेण्यात आली.
राज्यसेवा पूर्व परिक्षा 2021 परिक्षेच्या शहरातील केंद्रांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी भेट देवून विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्थेसह इतर सुविधांची प्रत्यक्ष माहिती घेतली. यामध्ये शासकीय विज्ञान संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दिक्षाभूमी, धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेस नगर तसेच सक्करदरा येथील कमला नेहरू महाविद्यालय या परिक्षा केंद्रांना भेट दिली. संबंधित परीक्षा यंत्रणेची त्यांनी काटेकोरपणे तपासणी केली.
लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी धनवटे नॅशनल कॉलेज या केंद्रावर 312 विद्यार्थी, शासकीय विज्ञान संस्था येथील केंद्रावर 384 विद्यार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रावर 960 विद्यार्थी तर कमला नेहरू महाविद्यालयाच्या केंद्रावर 480 विद्यार्थ्यांच्या लेखी परिक्षेची व्यवस्था करण्यात आलेली होती. कोवीड प्रोटोकॉलचे पालन करून विद्यार्थ्यांनी परिक्षेमध्ये आपला सहभाग नोंदविला.