महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा होणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई :- देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. “महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव” ऑगस्ट ते नोव्हेंबर, 2023 याकाळात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

आज महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. मुख्य कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सवातील कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

सन १८६१ च्या इंडियन कौन्सिल ॲक्टनुसार स्थापित कौन्सिल ऑफ द गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Council of the Governor of Bombay) ची पहिली बैठक २२ जानेवारी, १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल (Bombay Legislative Council) ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत गव्हर्नर ऑफ बॉम्बे (Governor of Bombay) यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल (Council) चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. नारायण चंदावरकर हे परिषदेचे पहिले नामनिर्देशित सभापती होते. रावसाहेब एच.डी. देसाई हे निवडणुकीद्वारे उपसभापतीपदी निवडून आले. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. कोविड – १९ महामारीमुळे यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.

ऑगस्ट ते नोव्हेंबर, २०२३ याकाळात विद्यमान आणि माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्वाची विधेयके, ठराव, प्रस्ताव यांचे पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचे प्रकाशन, असे विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदेश भाजपाच्या विविध मोर्चा, आघाड्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Fri Jul 7 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या प्रमुखपदी संजय गाते, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी दिलीप कांबळे तर किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी गणेश भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पक्षाच्या सर्व प्रदेश मोर्चे, आघाड्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली असून परराष्ट्र संबंध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, विधानसभा विस्तारक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!