गावागावात सामाजिक न्याय योजनांच्या माहिती पुस्तिकेचे वाटप
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती
नागपूर, दि. 28 : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सबंध महाराष्ट्रात येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात ध्वजारोहणाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती पुस्तिका गावोगावी नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याचे ठिकाणी पालकमंत्री, ग्रामीण भागात लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत या विकास योजनांचे संक्षिप्त स्वरुपात वाचनही करण्यात येणार आहे.
यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्य कोरोनातून निर्बंधमुक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करुन साजरी केली. राज्य सरकारने दोन वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असून या कालावधीत सामाजिक न्याय मंत्री यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये कालानुरुप सकारात्मक बदल केले आहेत. त्या बदलांचे सकारात्मक परिणाम लाभार्थींच्या टक्केवारीत दिसून येत आहेत. अनेक योजना नाविन्यपूर्ण रीतीने राबविणे, काही नवीन योजना अंमलात आणणे, याद्वारे विभागाच्या कार्याचा एक वेगळा ठसा या काळात उमटवला आहे. अनुसूचित जाती, नवबौध्द घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांच्या बाबतीत जनजागृती करुन तळागाळातील गरजुंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून, समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमांची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आगळयावेगळया उपक्रमाचा राज्यातील जनतेला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
1 मे, महाराष्ट्र दिनी सपूर्ण नागपूर विभागात ध्वजारोहणाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनाबाबतची माहिती पुस्तिका गावोगावी नागरिकांना वाटप करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुकत डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सर्व महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.