समाज व कृषी क्षेत्राच्या समन्वयाने ‘महाबिजोत्सव’ व्हावा – प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा

– ‘राष्ट्रीय बीज महोत्सवा’ला थाटात सुरुवात

नागपूर :- मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध व शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषीक्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबिजोत्सव व्हावा, अशा भावना प्रगतीशिल शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज येथे व्यक्त केल्या.

येथील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या (वनामती) स्व.वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित राष्ट्रीय बिजोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात शर्मा यांनी हे विचार मांडले. वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, बिजोत्सव संकल्पनेचे जनक प्रगतिशील शेतकरी वसंत फुटाणे यावेळी मंचावर उपस्थित होते.

वनामती, आत्मा आणि बिजोत्सव समुह यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती परीसरात तीन दिवसीय राष्ट्रीय बीज महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी शर्मा यांनी शेतीसाठी बियाण्यांचे महत्त्व विषद करतांना शुद्ध बियाण्यांसोबतच पाणी, हवा आणि माती हे घटक शुध्द व चिरंतण ठेवण्याचे आवाहन सद्य:स्थितीत असल्याचे सांगितले. हे आवाहन पेलण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची जबाबदारी समजून योगदान देण्याची व कृषी क्षेत्राचा उत्तम समन्वय ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. या समन्वयातून देशात ठिकठिकाणी महाबिजोत्सवाचे आयोजन होवून सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी शर्मा यांनी व्यक्त केला. त्यांनी कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांबाबत विस्तृत माहिती दिली.

मित्ताली सेठी म्हणाल्या की, आपल्या आवतीभवती शेतीत वेग-वेगळे संशोधन, नव-नवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनामती संस्थेसमोर आपल्या संकल्पना मांडाव्यात त्या जास्तीत-जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्था पुढाकार घेईल. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शेतीतील नवनवीन प्रयोग व संशोधनाला सर्वदूर पोहचविणे, संशोधन व्यवस्थापन, जीआयएस, कृषी उत्पादक शेतकरी आदी घटकांना एकत्र आणून यास चळवळीचे स्वरुप देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

रविंद्र मनोहरे यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. डॉ. अर्चना कडू यांनी प्रस्ताविक केले. बीजोत्सव समुहाच्या समन्वयक कीर्ती मंगरुळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राची माहुरकर यांनी आभार मानले.

शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संशोधक, सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी व पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने 27 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात परंपरागत बियाण्यांचे प्रदर्शन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन व विक्री, भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम होत आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्रपदेश, तामिलनाडू आदी 18 राज्यातील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवात सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाणांच्या जातींचे जतन व प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

*शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा* 

महोत्सवात तीनही दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 27 एप्रिल रोजी ‘बियाणे संवर्धन आणि व्यवस्थापनामधील आव्हाने व संधी’ या विषयावर संजय पाटील यांचे मार्गदर्शन झाले. तसेच, सुभाष शर्मा यांचे ‘हवामान बदलासह पीक पध्दती बदलणे’ विषयावर आणि ‘शेतकऱ्यांना खात्रीशिर उत्पन्न व ग्राहकांना सुरक्षित अन्न’ विषयावर रश्मी बक्षी यांनी मार्गदर्शन केले.

रविवार 28 एप्रिल रोजी ‘नैसर्गिक संसाधने’ विषयावर दादा शिंदे तर ‘दुषित आणि सेंद्रिय मातीचा अभ्यास आणि मानवी आरोग्यावर होणारा त्यांचा परिणाम’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार व डॉ. मीना शेलगावकर मार्गदर्शन करतील. ‘जैवविविधतेचे संरक्षण ग्रामसभा व एफआरए द्वारे सहभागी पध्दतीने बाजरीच्या पाककृती आणि त्यामागील विज्ञान’ विषयावर अंजली महाजन मार्गदर्शन करणार आहेत.

समारोपाला सोमवार, 29 एप्रिल रोजी ‘जैव संसाधन इनपुट केंद्राची स्थापना’ विषयावर एनसीएनएफ आणि शेतकऱ्यांद्वारे तर ‘महिला शेतकरी बीज संवर्धनाच्या कथा’ विषयावर सुवर्णा दामले मार्गदर्शन करणार आहेत.

*महोत्सवात आज मुलांसाठी चित्रकला स्पर्धा*

रविवार 28 एप्रिल रोजी वनामती येथे ‘भविष्यातील पर्यावरण संतुलन’ विषयावर 8 ते 12 वर्ष व 13 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सकाळी 9 वाजता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आत्मातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

Sun Apr 28 , 2024
– लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची घेतली माहिती मुंबई :- इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com