मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023 चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
‘लोकराज्य’च्या या अंकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूंवर आधारित अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर लेख लिहिले. याबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले. यापैकीच ऑक्टोबर 1948 मध्ये ‘द अनटचेबल्स्’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाने यावर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने विशेष लेखाचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, विशेषतः त्यांच्या जीवनातील विविध क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा तसेच महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे.
पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष 3 सप्टेंबर 2023 रोजी संपले. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष लेखांचा समावेशही ‘लोकराज्य’च्या या अंकात आहे. याबरोबरच ‘मंत्रिमंडळात ठरले’ या सदराचाही समावेश आहे.
हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.