नागपूर :- पथ विक्रेत्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेतला असून १० हजार रुपयांचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंदर्भात उद्या गुरूवार १० ऑगस्ट रोजी बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शाखा निहाय कर्ज वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थी पथ विक्रत्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे यांनी केले आहे.
गुरूवारी (ता.१०) बँक ऑफ इंडियाच्या अजनी चौक, अनंत नगर, हुडकेश्वर, बेसा, धरमपेठ, दिघोरी, गांधीबाग, गोधनी, मानकापूर, इतवारी, कडबी चौक, कळमना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सीताबर्डी, खामला, महाल, मानेवाडा, मेडीकल चौक, राणा प्रताप नगर, सोमलवाडा, रेशीमबाग, त्रिमूर्ती नगर, वैशाली नगर या शाखांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय १८ आणि १९ ऑगस्ट रोजी पंजाब नॅशनल बँक च्या माध्यमातून शाखा निहाय कर्ज वितरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या किंगस्वे, इंदोरा चौक, गांधीबाग, सीताबर्डी, धरमपेठ, खामला, लकडगंज, हनुमान नगर, पी.डब्लू.एस. कॉलेज, सूर्या नगर या शाखांमध्ये शिबिर घेण्यात येणार आहे.
पथ विक्रेत्यांना शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम स्वनिधि संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. योजनेच्या लाभाकरिता www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच जवळच्या नागरी सुविधा केंद्र (CSC Centre) ला जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे. पथ विक्रेत्यांना अर्ज भरण्याकरिता त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक हे आधार कार्ड सोबत संलग्न असणे आवश्यक होते. परंतू केंद्रशासनाअंतर्गत नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून बायोमॅट्रीक डिव्हाईसद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या बँकेत बचत खाते असेल त्या बचत खात्यासोबत आधार कार्ड व भ्रमणध्वनी क्रमांक संलग्न असणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करताना पथ विक्रेत्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड सोबत लिंक असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथ विक्रेत्यांना ‘क’ आणि ‘ड’ या दोन प्रवर्गात विभागण्यात आले आहे. नागरी स्वराज्य संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणात जे पथ विक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे. अशा पथ विक्रेत्यांना नागरी संस्थांमार्फत शिफारस पत्र (Letter of Recommendation) प्राप्त झालेले पथ विक्रेते यांचा ‘क’ प्रवर्गात समावेश होतो. तर जवळपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामिण भागातील पथ विक्रेते नागरी क्षेत्रामध्ये पथ विक्री करतात आणि त्यास नागरी संस्थांमार्फत शिफारस पत्र (Letter of Recommendation) प्राप्त झालेले पथ विक्रेते हे ‘ड’ प्रवर्गामध्ये येतात.
झोनमध्ये विशेष मदत कक्ष
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांनी सदर योजनेची सविस्तर माहिती प्राप्त करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्र. १ ते १० अंतर्गत विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या मदत कक्षाला भेट देऊन शहरातील पथ विक्रेत्यांनी या योजनेच्या संधीचा लाभ घ्यावा, याकरिता महानगरपालिका मार्फत सर्व्हेक्षण यादीतील पथ विक्रेत्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आतापर्यंतचे लाभार्थी
पीएम स्वनिधि योजने अंतर्गत सद्यस्थितीत नागपूर महानगरपालिका अंतर्गत ४८,९८२ पथ विक्रेत्यांनी प्रथम टप्पा १० हजार रुपयांकरिता अर्ज सादर केले असून, त्यापैकी २८,०६५ पथ विक्रेत्यांना बँकेमार्फत कर्ज वितरीत करण्यात आले आहे. तसेच दुसरा टप्प्याकरिता प्राप्त १२,९८४ अर्जांपैकी ७,०७८ पथ विक्रेत्यांना बँके मार्फत २० हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे व तिसऱ्या टप्प्याकरिता प्राप्त ७५६ अर्जांपैकी ६५१ पथ विक्रेत्यांना बँके मार्फत ५० हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.