यवतमाळ जिल्ह्याची साहित्य समृद्धी – विनय मिरासे ‘अशांत’यवतमाळ

साहित्य हा तीन अक्षरी शब्द! जीवन व्यापून टाकणारा, जीवनाला गवसणी घालणारा, जीवनाचे प्रतिबिंब असणारा, जीवनाला समजावून सांगणारा, जीवनाला साथ देणारा, जीवनाला समजून घेणारा, जीवनाला व्यापून उरणारा, जीवनाचा मार्गदर्शक असणारा आणि जीवनाला घडविणारा! साहित्याने माणसे घडतात, एवढेच नव्हे तर परिवर्तनेही घडतात. जे जीवनाच्या सहीत असतं ते साहित्य-असं म्हटलं जातं. पण खरं तर जे जीवनाला सावरतं ते साहित्य हेच पूर्णांशाने खरं आहे. जीवन कसं आहे, हे साहित्य दाखवीतं. पण त्यासोबतच जीवन कसं असावं हेही साहित्य दाखवतं. त्यामुळेच साहित्याचे मानवी जीवनात अनन्य साधारण स्थान आहे. आज सर्वत्र साहित्य आणि साहित्यिकांची अगदी रेलचेल झालीय. यातलं खरं साहित्य तेच जे वाचकांच्या डोळ्यांद्वारे मस्तकापर्यंत जातं, आणि मस्तकापासून मन, मेंदू पर्यंत पोहचतं. एखाद्याने सलग काही दिवस विविध साहित्य प्रकारातील काही पुस्तके वाचलीत. तर त्या सर्व पुस्तकांमधील जे-जे त्याच्या मन मेंदूला चिकटून राहील, त्याच्या मनावर आणि त्यामुळे जीवनावर प्रभाव करेल, ते खरं साहित्य!

आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून राष्ट्रीय स्तरावर शासनमान्य झाली आहे. त्यामुळे तिच्यात निर्माण होणारे साहित्य हे यापुढेही अभिजातच असायला हवं. मराठी भाषेतील यच्चयावत साहित्याचा समग्र अभ्यास केला तर काही किरकोळ अपवाद वगळता एकूणच सारं साहित्य हे अभिजात वा सकस, सरस आणि अक्षर साहित्य म्हणूनच गणल्या गेलं आहे.

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातला लैकिक प्राप्त जिल्हा आहे. आदिवासी लोकजीवन, कापसाची निर्मिती, विविध ऐतिहासिक व रमणीय स्थळे आणि स्वातंत्र्य चळवळीतील भरीव योगदान यासाठी या जिल्ह्याची भारतभर ख्याती आहे. अशा लौकिक प्राप्त जिल्ह्याचे साहित्य क्षेत्रात नाव मागं कसं राहील. यवतमाळ जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृती यांचाही विलोभनीय, स्पृहणीय व भरीव असा वारसा आहे. अगदी प्राचीन काळ सोडला तरी साधारण दीडशे दोनशे वर्षापूर्वीपासून यवतमाळ जिल्ह्याची साहित्य समृद्धी ही वाखाणण्यासारखी आहे. पृथ्वीगीर गोसावी, गु. ह. देशपांडे, वीर वामनराव जोशी, कवी उत्तमश्लोक ही या जिल्ह्यातील प्राचीनतम साहित्य श्रेष्ठीची नावे. त्यानंतर इंग्रजकालीन संमिश्र जीवन व्यवस्थेत निष्ठेने लेखन करणारे व सामाजिक उत्थानासोबतच स्वातंत्र्य चळवळीची पाठराखण करणारे साहित्य श्रेष्ठीही या जिल्ह्यात होऊन गेले आहेत. लोकनायक बापूजी अणे, ब. ना. एकबोटे, वीर वामनराव जोशी, प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर, सिंधुताई मांडवकर आणि अन्य काही नावे ही यातली जनमान्य नावे आहेत.

या श्रेष्ठींनी आपल्या साहित्यकृतींनी तत्कालिन जनमानसावर सुयोग्य प्रभाव टाकला अशा नोंदी वाचल्याचे मला आठवते. मात्र त्यानंतरचा स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ यवतमाळ जिल्ह्यासाठी अगदी बहारीचा काळ म्हणावा लागेल असा आहे. कथा, कविता, कादंबरी, गीते, नाट्ये आणि वैचारिक ललित लेखनाला सुगी येण्याचा हा स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा काळ. या काळात पां. श्रा. गोरे, भाऊसाहेब पाटणकर, गौतम सुत्रावे, प्राचार्य राम शेवाळकर ही आणि अन्य काही नावे यवतमाळ जिल्ह्यात आघाडीवर होती. या साधारणत: पन्नास वर्षाच्या कालखंडात पां. श्रा. गोरे यांची ‘कात टाकलेली नागिन’” ही ग्रामीण जीवनावरील वास्तववादी कादंबरी त्या काळातील रसिक व बहुश्रुत वाचकांच्या चर्चेचा, पसंतीचा आणि कौतुकाचा विषय ठरली. गोरेंच्या कविताही तेवढ्याच ताकदीच्या व खुमासदार. “आम्ही तर जंगलची पाखरे” ही त्यांची कविता तर अलीकडील विठ्ठल वाघाच्या तिफन कवितेसारखी त्या काळात सर्वतोमुखी झाली होती. भाऊसाहेब पाटणकर हे त्यांच्या थोड्या बहुत आगचे मागचे कवी. मात्र भाऊसाहेबांना महाराष्ट्रातला जनलोक ओळखतो तो कवीपेक्षा शायर म्हणून. हिंदी उर्दूच्या धरतीची मराठी शायरी भाऊसाहेबांनी प्रसवली. अन् त्या शायरीने त्या काळात अगदी पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर म्हणजे अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत लोकांना वेड लावले.

यवतमाळ जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध करणारे पाटणकर बहुदा पहिले साहित्यिक असावे. त्यानंतरच्या काळात दे.शि. दुधलकर, गौतम सुत्रावे, श्रीकृष्ण काळे आदी मंडळींनी काव्य लेखन केले. परंतु साहित्य क्षेत्रात जिल्ह्याला नाव लौकिक प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले ते वणीचे गौतम सुत्रावे यांनी. सुत्रावेंच्या गीतकाव्यांनी त्याकाळी महाराष्ट्रीय जन माणसाला सर्वार्थाने जिंकून घेतले. “अमृतवाणी ही बुद्धाची ऐक देऊनी ध्यान, साधण्या या जन्मी निर्वाण” यासारखी गहन गीते लिहिणाऱ्या सुत्रावेंनी जिल्ह्याला फार मोठा लौकिक प्राप्त करून दिला. त्यांच्यासोबतच्या त्या काळातल्या अनेक कवींनी आपापल्या कवितांतून जनप्रबोधन केले. परंतु आपली नाम मुद्रा साहित्याच्या प्रांतात यवतमाळ जिल्ह्याची म्हणून उमटविण्यात जे काही फार थोडे लोक यशस्वी झाले, त्यापैकी आणखी एक नाव म्हणजे पोहंडूळ येथील नीलकृष्ण देशपांडे हे होय. पोहंडूळ सारख्या आडबाजूच्या खेड्यात राहून कुठलेही साहित्यिक वातावरण व वारसा नसताना त्यांनी केलेली काव्य साधना नवोदितांना प्रेरित करून गेली. दिग्रसचे प्राध्यापक ज. सा गवळीकर यांनीही त्या काळात काही साहित्य निर्मिती केली.

सुधाकर कदम हेही नाव त्या काळात आमच्या सतत कानावर पडायचे. परंतु ते लेखक व कवी म्हणून नव्हे तर मुख्यत्वे गझल गायक म्हणून. कदम यांनी त्यानंतर काही थोडी बहुत साहित्य निर्मिती केली परंतु ती बरीच नंतर. त्यांचा “फडे मधूर खावया” हा ललित लेख संग्रह त्याकाळात बराच गाजला. त्या काळात आपल्या लयबद्ध, नादबध्द आणि लोकानुवर्ती काव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं ते शंकर बडे या लोककवीने. त्यांच्या वऱ्हाडी ठसक्यांच्या कविता आणि ‘बॅरिस्टर गुलब्या’” हे रंगतदार व्यक्तीकथन महाराष्ट्राच्या कौतुकाचे विषय ठरले होते. कविवर्य शंकर बडेचा हा काव्य वारसा थोड्याफार वेगळ्या ढंगाने चालविला तो नेर परसोपंत (माणिकवाडा) येथील डॉ. मिर्झा रफी बेग यांनी. आपल्या किस्सेबाज कवितांनी आणि खटकेबाज विनोदी किस्से यांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हा कवी यवतमाळ जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर रोशन करण्यात अव्वल ठरला हे नक्की.

याच काळात कविता आणि गझलेच्या क्षेत्रात कलिम खान, ललित लेखांच्या क्षेत्रात सुरेश गांजरे, कथेच्या क्षेत्रात प्रा. कमलाकर हनवंते, आंबेडकरी विचारधारेच्या कविता क्षेत्रात प्रा.डॉ. सागर जाधव, बळी खैरे, सुनिल वासनिक, आनंद गायकवाड, योगानंद टेंभुर्णे, मूळचे यवतमाळ जिल्ह्याचे असलेले कवी केतन पिंपळापुरे, प्रा. माधव सरकुंडे या दिग्गज कवींनी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने यवतमाळ जिल्ह्याचे नाव साहित्य क्षेत्रात मोठे केले. त्यापैकी बळी खैरे यांच्या कविता आणि चित्रे भारताच्या सीमा ओलांडून विदेशात ही गेल्या. प्रा. डॉ. सागर जाधव व प्रा. माधव सरकुंडे यांच्या कथा, कविता व वैचारिक लेखनांनी केवळ विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळवले असे नव्हे तर जनसामान्याच्या अंत:करणावरही त्यांनी आपली छाप पाडली. प्रा. डॉ. सागर जाधव यांचा ‘उजेड’ हा काव्यसंग्रह आणि प्रा. माधव सरकुंडे यांचे मर्यादित परंतु सरस साहित्य हा जनलोकांचा चर्चेचा आणि विचार मंथनाचा विषय ठरला. वामनदादा कर्डकांचे काव्यमय चरित्र लिहिणारे व त्यांच्या गीत-लेखनाचे समर्थपणे संपादन करणारे प्रा. डॉ. सागर जाधव हे महाराष्ट्रातील प्रथम साहित्यिक ठरले आहेत.

याच काळात थोडे मागे पुढे लिहू लागलेले शरद पिदडी, गजेश तोंडरे, विनय मिरासे ‘अशांत’, सुभाष उसेवार, प्रा. रमेश वाघमारे, रवींद्र चव्हाण, प्रा.दिनकर वानखडे, कृष्णा लाडसे, रमेश घोडे, आशा दिवाण, विजया एंबडवार, शुभदा मुंजे, विलास भवरे, प्रा. अनंत सूर, प्रा.डॅा.रविकिरण पंडित, आत्माराम कनिराम राठोड, प्रा. डॉ. दिलीप अलोणे, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, पंढरीदास खर्डेकर, रशिद कुरैशी, बसवेश्वर माहुलकर या व इतर काही कवी लेखकांनी जिल्ह्याच्या साहित्य इतिहासाला वैभव प्राप्त करून दिला. यापैकी बहुधा सर्वांनी फक्त कविता हा प्रकार हाताळला. मात्र विनय मिरासे यांनी कवितेसोबतच बालवाड:मय, कथा, वैचारिक लेख, ललित लेख व समीक्षणे ह्या प्रांतातही यशस्वी मुसाफिरी केली. शरद पिदडी यांच्या गेय व भाव कवितांनी महाराष्ट्रभर लोकांची दाद घेतली. त्यानंतरच्या पिढीतले तरुण तडफदार व ख्यातीप्राप्त साहित्यिक म्हणजे पुसदचे प्रा. रविप्रकाश चापके, विजय ढाले, प्रा. सुरेश धनवे, गजानन वाघमारे, निशा डांगे, अल्पना देशमुख, हेमंत कांबळे, विनोद बुरबुरे, प्रमोद कांबळे, प्रशांत वंजारे, प्रविण चांदोरे, अतुल कुमार ढोणे, सुनील आडे, अनिमिष मिरासे, दुष्यंत शेळके, स्नेहल सोनटक्के, रुपेश कावलकर, प्रविण तिखे, गजेंद्र ठुणे, गिरीश खोब्रागडे, आनंद देवगडे, प्रा. पुनीत मातकर, विजयकुमार ठेंगेकर, प्रफुल ठेंगेकर, अजय चव्हाण, वैशाली गावंडे, गजानन वाघमारे, निलेश तुरके, व्ही. पी.पाटील, गजानन दारोडे, शेख गणी, जयकुमार वानखेडे, विजय बिंदोड हे होत.

यापैकी प्रा. पुनित मातकर, गजानन वाघमारे, प्रशांत वंजारे, प्रमोद कांबळे, गुलाब सोनोने, निलेश तुरके, प्रविण तिखे, रुपेश कावलकर, रविप्रकाश चापके, विजय ठेंगेकर ही अत्यंत प्रभावी व बिनीची नावे आहेत. त्यातील प्रशांत वंजारे, विनोद बुरबुरे व हेमंत कांबळे ही नावे आंबेडकरी वैचारिक साहित्यात आणि गझलच्या क्षेत्रात आपापली नाममुद्रा उमटून बसली आहेत. रुपेश कावलकर, स्नेहल सोनटक्के, गुलाब सोनोने, अतुल ढोणे, निलेश तुरके, अक्षय गहुकार, ज्योती उमरेडकर व वैशाली गावंडे हे कविता, गझल आणि निवेदन या क्षेत्रातील चमकते तारे आहेत.

एकूणच यवतमाळ जिल्ह्याची साहित्य परंपरा ही अत्यंत भरीव व समृद्ध आहे. महाराष्ट्राच्या साहित्य राशीत यवतमाळ जिल्ह्याने छोटी पण मोलाची भर टाकली आहे. यवतमाळ जिल्ह्यात लेखन करणारे आणखीही काही लेखक कवी असतील पण त्यांची नावे न घेणे हा माझ्या विस्मरणाचा भाग आहे. तेव्हा अशा लेखकांनी मला अंत:करणापासून क्षमा करावी, ही विनंती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मेडिट्रिना हॉस्पिटल असुरक्षित घोषित; तात्काळ रिकामे करण्याचे आदेश

Sat Feb 22 , 2025
– NMC अग्निशमन विभागाची कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) अग्निशमन विभागाने 18-02-2025 रोजी मेडिट्रिना हॉस्पिटलला अत्यंत असुरक्षित घोषित करत तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. आवश्यक अग्निसुरक्षा आणि जीवनसुरक्षा उपाययोजना न पूर्ण केल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली. यापूर्वी, NMC च्या आरोग्य विभागाने 12-02-2025 रोजी हॉस्पिटलला इशारा दिला होता की, एक महिन्याच्या आत अंतिम अग्नि संरक्षण मान्यता प्रमाणपत्र (Fire […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!