यवतमाळ :- घाटंजी विधी सेवा समितीच्यावतीने आर्णी तालुक्यातील इचोरा माध्यमिक विद्यालयात रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम, वाहतुक नियम व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा याबाबत विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने अध्यक्ष एन.व्ही. न्हावकर व सचिव के.ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अतुल उत्पात तसेच पारवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक श्री.नरसाळे तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान तसेच मूलभूत कर्तव्ये यांचे महत्व पटवून दिले. आदर्श विद्यार्थी होण्याकरीता राष्ट्रीय प्रतिज्ञेनुसार सर्व भारतीयांशी बंधुभाव असणे, सर्व वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवणे व सर्वांशी सौजन्याने वागणे आवश्यक असल्याचे संगितले. विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या शब्दात गुन्हा म्हणजे काय हे समजावून सांगितले तसेच समाजात गुन्हा घडत असल्यास सदर घटनेची माहिती तत्काळ पोलिस हेल्पलाईनवर द्यावी, विद्यार्थ्यांना चांगला व वाईट स्पर्श यातील फरक सांगितला.
विद्यार्थ्यांपैकी मुलगा अगर मुलगी यांना कोणी वाईट स्पर्श केल्यास स्वसंरक्षण अधिकाराचा वापर करून त्याचा विरोध तसेच याबाबत तत्काळ पालक व शिक्षकांना सांगितले जावे, स्वसंरक्षण व बचावाकरीता स्वत:चे शरीर सुदृढ बनविण्यासाठी व्यायामाचे महत्व, मोबाईलचा वापर करतेवेळी शासनाने बंदी घातलेल्या तसेच समाजास घातक संकेतस्थळावरील छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहून त्यांना प्रसिध्दी दिल्यास सायबर शाखेमार्फत गुन्हा दाखल होवू शकतो, याची जाणीव करून दिली. सोशल मीडियाचा वापर केवळ चांगले काम व अभ्यासाकरीता करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नितीमुल्ये जपले गेली पाहिजे. समाजात बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. शाळेमध्ये एकमेकांची छेड काढल्यास रॅगिंग अधिनियम अंतर्गत निलंबन होवून खटला दाखल होऊ शकतो, याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.