डिहायड्रेशनमुळे मेंदूत जीवघेणी रक्ताची गाठ, वेळीच प्रभावी उपचार करत डॉ. अमित भट्टी यांनी वाचवले प्राण!

नागपूर :- एम. यांचा होळीचा सण रंगांनी आणि आनंदाने भरलेला होता. पण त्यांच्या पतींसाठी हा सण एक मोठे संकट घेऊन आला. सुरुवातीला त्यांना हलकीशी डोकेदुखी जाणवली होती, जी मायग्रेन असेल असे दोघांना वाटले. पण काही दिवसांनी त्यांना अचानक फिट येऊन ते कोसळले आणि परिस्थिती गंभीर झाली, शरीराचा पूर्ण उजवा भाग कमजोर झाला आणि ते बोलूही शकत नव्हते.

तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की ते खूप डिहायड्रेटेड (शरीरात पाण्याची कमतरता) झाले आहेत., एमआरआय आणि पुढील चाचण्यांमध्ये हे स्पष्ट झाले की त्यांच्या मेंदूमध्ये सेरेब्रल व्हेनस सायनस थ्रॉम्बोसिस (सीव्हीएसटी) नावाची एक दुर्मिळ पण गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाल्यामुळे होते आणि यातून मेंदूमध्ये रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) देखील होऊ शकतो.

डॉक्टरांनी त्वरित रक्त पातळ करणारी औषधे सुरू केली तरी त्यांची प्रकृती अजूनच बिघडत गेली. सतत फिट्स येऊ लागल्या आणि “स्टेटस एपिलेप्टिकस’’ नावाची जीवघेणी स्थिती निर्माण झाली. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यावर नागपूरचे सुप्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. अमित भट्टी यांना बोलावण्यात आले.

नेहमीप्रमाणे औषधांनी रक्ताची गाठ पातळ होण्यावर अवलंबून न राहता, डॉ. भट्टी यांनी “मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी’’ नावाची अत्याधुनिक आणि कमी शस्त्रक्रियेची उपचारपद्धती प्रभावीपणे पार पाडली. या प्रक्रियेदरम्यान पायाच्या शिरेमध्ये केवळ ३ मिमीचे छोटे छिद्र करण्यात आले आणि एक ट्यूब मेंदूपर्यंत पोहोचवण्यात आली. या ट्यूबच्या मदतीने मेंदूतून रक्ताची गाठ थेट काढून टाकण्यात आली. उपचारानंतर केवळ काही तासांतच रुग्णाला फिट येणे बंद झाले आणि केवळ २४ तासांत त्यांचा उजवा भागही पूर्ववत काम करू लागला. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया किंवा टाके न लावता डॉ. अमित भट्टी यांनी रुग्णाला जीवनदान दिले.

पुढील तपासणीत असे आढळून आले की रुग्णाला असलेल्या कामाच्या व्यापामुळे आणि सततच्या प्रवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता झाली होती. त्यातच उन्हाळ्याला असल्याने तापमान वाढीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे रक्त घट्ट झाले आणि मेंदूत गाठ निर्माण झाली.

ही सर्वांसाठीच धोक्याची सूचना असून डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.

सीव्हीएसटी ही अत्यंत दुर्मिळ पण जीवघेणी समस्या आहे. एकूण स्ट्रोकच्या ०.५-१% प्रकरणांमध्ये ही परिस्थिती आढळते. ही समस्या वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये अधिक दिसून आली असून डिहायड्रेशन हे यामागील एक मोठे कारण असून आपण नेहमी याकडे दुर्लक्ष करतो.

जोखीम वाढवणारी इतरही कारणे आहेत जी महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न भिन्न आहेत. महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्याचे सेवन, गर्भधारणाचा काळातील गुंतागुंत, हॉर्मोनल थेरपी जोखीम वाढविणारे घटक ठरू शकतात. तर, पुरुषांमध्ये शरीरात होमोसिस्टीन नावाच्या घटकाचे वाढलेले प्रमाण,सततचे मद्यपान, आनुवंशिकरित्या रक्त गाठी तयार होण्याच्या समस्या धोकादायक घटक ठरू शकतात. लठ्ठपणा, धूम्रपान, काही संसर्गजन्य आजार, ल्युपससारखे जुनाट आजार ही तर सामान्य घटके आहे ज्यामुळे कुणामध्येही सीव्हीएसटीची परिस्थिती उदभवू शकते.

उन्हाळ्यात ही समस्या अधिक वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता होत असल्याने, सीव्हीएसटीची प्रकरणे वाढू लागतात. त्यात जर मद्यपान जास्त केले तर हा धोका आणखी वाढतो.

घ्यावयाची काळजी :

भरपूर पाणी प्या. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक ठेवा. अती मद्यपान व धूम्रपान टाळा. जर सतत डोकेदुखी राहत असेल, फिट येत असेल किंवा अचानक अशक्तपणा जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वेळेवर दिलेल्या प्रभावी उपचारांमुळे आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने या रुग्णाला जीवनदान मिळाले. पण योग्य काळजी घेतली तर अशा घटना वेळीच रोखता येऊ शकतात!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुष्ठरोग निर्मुलनासाठी समन्वयाने कार्य करा - डॉ. दीपक सेलोकर

Wed Mar 26 , 2025
– मनपामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा नागपूर :- कुष्ठरोग हा आजार सर्वांसाठीच मोठे आव्हान आहे. कुष्ठरुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना सुरु आहेत. अशात कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपाचाराखाली आणणे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी मनपा, अधीक्षक नागरी कुष्ठरोग पथक (SULU), शासकिय व खासगी डॉक्टर्स या सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!