महसूल वाढीच्या माध्यमातून प्रगतशील भारत घडवूया – उपराष्ट्रपती

– आव्हानांवर मात करीत नवकल्पना स्वीकारा

– ‘प्रणिती’ व्याख्यानमालेचे उदघाटन

नागपूर :- दिवसागणिक बदलते तंत्रज्ञान हे महसूल अधिका-यांपुढील खरे आव्हान आहे. या आव्हानावर मात करीत विभागाबद्दल विश्वासार्हता वाढवून नवकल्पना स्वीकारण्याची आवश्यकता आहे, त्यासोबतच सर्वसामान्य करदात्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्परता दाखवून प्रगतशील, संपन्न आणि सशक्त भारत घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 76व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिका-यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेचे उदघाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॅा. सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक (प्रशिक्षण) वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.

‘कोष मूलो दण्डः’ हे आयकर विभागाचे ब्रीद आहे. कोषागार हा उत्तम प्रशासनाचा पाया असतो. भारतीय महसूल सेवा ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे रक्षण आणि देखरेख करण्यात महत्वाची भूमिका बजावते. देशाची आर्थिक स्थिरता आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्यात या सेवेतील अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, करदात्यांनी कररूपात दिलेला प्रत्येक रुपया हा सर्वसामान्यांची जीवनशैली बदलण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. राष्ट्र उभारणीत भारतीय महसूल सेवेचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.

महसूल कायद्यांची प्रभावी व लोकाभिमूख अंमलबजावणीही तितकीच सहज व सुलभरित्या होण्याची गरज आहे. एखाद्या करविषयक कायद्याची संपूर्ण संकल्पना, रचना ती राबविताना भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असते. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी महसूल अधिका-यांना स्वीकारायची आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ई-ऑफिसची संकल्पना साकार व्हावी त्यामुळे संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस’ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती धनखड यांनी व्यक्त केला.

करदात्यांनी 31 जुलैपर्यंत 6.77 कोटी आयकर परतावा सादर केला असून गतवर्षीच्या तुलनेत हा 16 टक्क्यांनी जास्त आहे. प्रथमच 54 लाख करदात्यांनी आयकर परतावा सादर केल्यामुळे कर भरणा-यांच्या संख्येत झालेली ही वाढ आश्वासक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

प्रास्ताविक नितीन गुप्ता यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी महसूल अधिकारी शोभिका पाठक यांनी केले. तत्पूर्वी, एनएडीटी परिसरात उपराष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सपत्निक वृक्षारोपण केले. प्रशिक्षणार्थी अधिका-यांशीही त्यांनी संवाद साधला.

‘प्रणिती’ व्याख्यानमालेविषयी…

‘प्रणिती’ या व्याख्यामनमालेचे आयोजन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीं महसूल अधिका-यांना समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या भावी भूमिकेसाठी त्यांना सज्ज करण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेच्या 76 व्या तुकडीत 57 अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि भूतान रॉयल सर्व्हिसचे 2 अधिकारी सध्या सेवापूर्व प्रशिक्षण घेत आहेत. नव्याने पदोन्नत झालेल्या सहाय्यक आयुक्तांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अकादमीत करण्यात आले आहे. एनएडीटी ही संस्था महसूल विभागाची शीर्ष प्रशिक्षण संस्था आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण - उपमुख्यमंत्री अजित पवार

Sat Aug 5 , 2023
मुंबई :- हेक्टरी पीकनिहाय पीक कर्जाच्या मर्यादेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरील समिती करीत असते. पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परत येण्याची शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती, केंद्र शासनाकडून शेतमाल किंमतीत झालेली वाढ, या सर्व बाबींचा विचार करून पीक कर्ज समितीकडून वाढविण्यात येते. असे पीक कर्ज वाढविण्यासाठी शासनाचे धोरण आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com