यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी चिकित्सालय, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलभुत कर्तव्ये या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक संदिप नगराळे उपस्थित होते. वक्ते संदीप नगराळे यांनी मुलभुत कर्तव्ये व बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कर्तव्ये हे ४२ व्या संशोधनामुळे अंतर्भुत केले. २१ (अ) मोफत व सक्तीच्या शिक्षणिचा अधिकार सदर कलमान्वये प्रदान करण्यात आला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य अतिथी व मार्गदर्शक कुणाल नहार यांनी शालेय जिवनापासून महाविद्यालय आणि त्यानंतर एक नागरीक म्हणुन कर्तव्यपरायण व्हावे व मुलभुत कर्तव्य पार पाडावित, असे आवाहन केले. मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत बोलतांना मुलांना ज्या गोष्टीमध्ये आवड असेल ती गोष्ट प्राधान्याने करू देणे. शिक्षणामुळे चांगला व्यक्ती घडू शकतो, असे यावेळी उपस्थितांना सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या योजनेबाबत माहिती सुध्दा दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत यांनी मुले ही देशाची संपत्ती आहे. मुले चांगली घडली तर देशाची प्रगती होते. त्यामुळे देश घडविण्याकरीता शिक्षण महत्वाचे असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यकमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक योगिता बोरा यांनी केले. कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच पॅरा विधी स्वंयसेवक उपस्थित होते.