नागपूर : नागरिकांना भाषेचे सर्वच ज्ञान असते असे नाही. स्थानिक भाषेमध्ये नागरिकांशी संभाषण व कामकाज केले तर ते फायदयाचे ठरेल. महाराष्ट्र राज्य शासनाचे निघणारे राजपत्र हे सुध्दा मराठीतच असतात. त्यामुळे आपण आपल्या कार्यालयातील दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात केले.
जिल्हा न्यायालय येथे न्यायधीशांचे सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्य “शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर” या विषयावर व्याख्यान व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा न्यायाधीश एम. एस. आझमी प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे होते. मराठी भाषेचे तज्ञ विजय सातोकर व मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आनंद मांजरखेडे उपस्थित होते.
मराठी भाषेचे महत्व सांगतांना न्या. झपाटे म्हणाले की, न्याय प्रणालीत मराठीतून कामकाज होत असते. ज्यामुळे सामान्य नागरिकांना न्यायप्रणालीतील कामकाज समजणे सहज व सोपी होते.
मराठी भाषेचे तज्ञ विजय सातोकर यांनी मराठी भाषेचा न्यायालयीन कामकाजात वापर याबाबत सांगतांना न्यायालयीन कामकाजात स्थानिक भाषेचा वापर केल्यास सामान्य नागरिकांना ते समजण्यास सोपी जाते. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेचे नागरिक जास्त प्रमाणात असल्यामुळे कार्यालयात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करणे गरजेचे आहे, असे सांगीतले
आनंद मांजरखेडे यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वरानी असे म्हटले आहे की, मराठी भाषेची निर्मिती पाली भाषेतून झाली आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी ” ही मराठी भाषेत लिहिलेली आहे. मराठी शास्त्रीय भाषा असून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून त्यांचे संवर्धनाची गरज आजच्या काळात आहे. ज्यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व आजचा काळात टिकवता येईल, असे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन 19 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. पी. राठोड यांनी केले तर उपस्थिताचे आभार 20 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वाय. एच. गजभिए मानले.