पारशिवनी :- पारशिवनी येथिल ग्राम पंचायत गरडा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान प्रती जागरूकता निर्माण होऊन मानवी मूल्यांची जोपासना व्हावी याउद्देशाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय या शाश्वत मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच अधिकार व कर्तव्य याची जाणीव शालेय जीवनापासूनच व्हावी या उद्देशाने शालेय स्तरावर मुख्याध्यापक खुशाल कापसे यांचे संकल्पनेतून २६ नोव्हेंबर संविधान दिन ते २६ जानेवारी गणराज्य दिन या कालावधीत माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रम अंतर्गत संविधान निर्मितीची प्राथमिक माहिती, उद्देशिका, राष्ट्रीय प्रतीके यावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा, घोषवाक्य सुलेखन स्पर्धा घेऊन गणराज्य दिनाच्या दिवशी विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले.