मुंबई :- कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकनामुळे महाराष्ट्र तसेच उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या उत्पादनात चौपटीने वाढ झाली आहे. विकिरण संशोधनाच्या माध्यमातून (रेडिएशन रिसर्च) कृषी क्षेत्रात क्रांती होईल व त्याचा संपूर्ण देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. १) अणुशक्ती नगर, मुंबई येथे ‘उत्तराखंड येथील कृषी क्षेत्र विकासासाठी रेडीएशन संशोधन’ या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. चर्चासत्राचे आयोजन दूनागिरी सामाजिक संस्था व उत्तराखंड सामाजिक संस्था यांनी संयुक्तरित्या केले होते.
जीआय मानांकनामुळे महाराष्ट्रातील केळींना जागतिक बाजारपेठेत चौपट भाव मिळाला. ही केळी महिनाभर चांगली राहतात. उत्तराखंड येथील पारंपरिक पेयाला तसेच गोमुख येथील गंगाजलाचे देखील भौगोलिक मानांकन होत आहे, असे सांगून राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण कृषी विद्यापीठांना भाभा अणु संशोधन संस्थेच्या सहकार्याने रेडिएशन संशोधन कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले. देशातील कृषी क्षेत्रात क्रांती यावी यासाठी भाभा अणु संशोधन संस्थेने अग्रेसर राहावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
उत्तराखंड येथे इंडियन इन्स्टिट्यूट न्यूक्लीअर ऍग्रीकल्चर स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरात लवकर प्रयत्न करू व तेथील मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता झालेली असून अन्नधान्य उत्पादनात, विशेषतः तृणधान्य उत्पादनात आघाडी घेतली तर भारत आत्मनिर्भर होईल असे वैज्ञानिक डॉ दिनेश कुमार अस्वाल यांनी सांगितले. या संदर्भात उत्तराखंड येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर ऍग्रीकल्चर सुरु करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अणुऊर्जेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन उत्तराखंड विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेचे महासंचालक डॉ दुर्गेश पंत यांनी केले.
चर्चासत्राला मूळचे उत्तराखंड येथील अभिनेते हेमंत पांडे, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बी सी पांडे, बीएआरसीचे नियंत्रक के जयकुमार, वैज्ञानिक डॉ तपन कुमार घंटी, उत्तराखंड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ एच जे पंत, दुनागिरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ एच भट्ट, वैज्ञानिक डॉ मनीष जोशी, आदी उपस्थित होते.