कोरोना नंतरचे आयोजन ;३० लक्ष उपस्थितीची अपेक्षा
नागपूर : ऐतिहासिक दीक्षाभूमी नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या 66 व्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
दीक्षाभूमी येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने यावर्षीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यंदाचा मुख्य कार्यक्रम दसरा सणाला ५ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता दीक्षाभूमी परिसरात होणार आहे. केंद्रीय दळणवळण तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्या रविवार 2 ऑक्टोबर पासून महिला धम्म मेळाव्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बाबासाहेबांना अपेक्षित भारत ‘, याविषयी परिसंवाद होणार आहे. सोमवार 3 ऑक्टोबर रोजी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यातर्फे दीक्षा देण्याचा कार्यक्रम. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण होणार आहे. दीक्षाभूमीवर थायलंड येथील भिकू संघातर्फे 56 फुटांची बौद्ध प्रतिमा देण्यात येणार आहे. त्या जागेचे भूमिपूजन सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. सायंकाळी धम्मपरिषद होईल.
बुधवार ५ ऑक्टोबरला स्मारक समितीतर्फे धम्म पहाट, सकाळी नऊ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व संध्याकाळी सहा वाजता 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला शासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे यावर्षी प्रचंड मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार असल्याची आयोजकांना अपेक्षा आहे. उद्यापासून येणारी अनुयायांची संख्या 30 लाखापर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आकस्मिक पाऊस आल्यास दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळांमध्ये आश्रयाची सोय करण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व बुद्ध विहारांमध्ये अनुयायांची व्यवस्था बुद्ध विहार कमिटीने करावी,अशी विनंती आयोजकांनी केली आहे. पाच तारखेला दसऱ्याच्या पर्वावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायंकाळी पाच वाजेपासून सह्याद्री दूरदर्शन, आवाज इंडिया, तसेच युसीएन या नागपुरातील वाहिनीवरून होणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महानगरपालिका, पोलीस प्रशासन व अन्य सर्व यंत्रणा देश विदेशातून तसेच देशातील विविध भागातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी सज्ज आहे, अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत स्मारक समितीचे सदस्य ॲड. आनंद फुलझेले,एन.आर.सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ चंद्रशेखर मेश्राम, भंते नागदिपांकर व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती बी.ए.मेहरे, मिलिंद गाणार उपस्थित होते.