Ø नागपूरकरांनी परिवारासह भेट देण्याचे आवाहन
Ø “रेशीम उद्योग “कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Ø आज शेतकरी सन्मान दिन
नागपूर :- नागपूरकरांनी दर्जेदार शेतमाल कडधान्य, तृणधान्य, डाळी, तांदूळ, भाजीपाला, फळे, प्रक्रिया पदार्थाच्या महोत्सवातील दालनाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करावी, असे आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी आवाहन केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, रेशीम संचालनालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत धान्य महोत्सवाच्या चौथ्या दिवशी ” रेशीम उद्योग “कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रेशीम उत्पादन हे शेतकऱ्यांना लक्षाधिश करणारे पीक आहे. पारंपरिक शेतीला पर्याय व शेतीला जोडधंदा मिळावा आणि पर्यायाने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे या हेतूने प्रेरित होऊन ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. प्रकल्प संचालक आत्मा डॉ. कडू यांनी रेशीम शेतीकरिता असलेल्या प्रचलीत योजनांची माहिती दिली. तसेच आत्मा यंत्रणेमार्फत गावस्तरावर रेशीम उत्पादनाच्या कार्यशाळा व लागवड वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्या बाबत माहिती दिली. रामटेकचे रेशीमश्री चंद्रभान धोटे, यांनी आपले रेशीम शेतीमधील अनुभव सांगून रेशीम शेती शेतकऱ्यांना लखपती करू शकते असे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले. रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी रेशीम शेतीचे ताळेबंद सांगितले व रेशीम शेती यशस्वी करण्याचे मूलमंत्र समजाऊन दिले. रेशीम कार्यालयाचे सहाय्यक संचालक पवनीकर तसेच जिल्हा रेशीम अधिकारी तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधान केले. या कार्यशाळेत डॉ. प्रकाश कडू सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय विद्यालय नागपूर तसेच डॉ विनोद खडसे विस्तार कृषी विद्यावेत्ता कृषि महाविद्यालय नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती पल्लवी तलमले प्रकल्प उपसंचालक आत्मा नागपूर यांनी केले.
दिनांक 23 डिसेंबर रोजी जिल्हा कृषी महोत्सवामध्ये “शेतकरी सन्मान दिन” साजरा करण्यात येणार असून या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्ये पूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सव मध्ये सहभागी गट शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महोत्सवाचे अखेरचे दोन दिवस राहिले असून 24 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत कृषी महाविद्यालय वसतिगृह परिसर क्रीम्स हॉस्पिटल समोर नागपूर येथे सुरू राहणार आहे.