संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 4:-सरकारी रुग्णालयात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिल करावे. त्यात अग्निशामक यंत्राचा वापर करण्याचे प्रशिक्षण सर्व कामगारांना द्यावे, अशा देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.या आदेशाचे पालन करीत आज कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक डॉ धुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आग प्रतिबंधक मॉक ड्रिल करण्यात आले.
शासनाने मार्गदर्शीत सूचना केल्यानुसार रुग्णालय परिसरांत अग्निशामक यंत्रणा (फायर एस्टिंग्विशर) बसविलेले असावे. ते कालबाह्य होण्यापूर्वी नियमितपणे पूर्ण भरले जावे. अग्निशमन यंत्र बसवितान त्या यंत्राचा वापर करण्यासाठी सहज काढता येणे शक्य होईल, अशा ठिकाणी ते बसविण्यात यावे. ‘फायर सेफ्टी ऑडिट’नुसार त्यातील त्रुटी दूर करून अग्निशमन यंत्रणा बसविण्यात यावीत. दर तीन महिन्यांनी मॉक ड्रिलमध्ये अग्निशामक यंत्राचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. रुग्णालयातील सर्व दस्तऐवज हे त्यांच्या छायाचित्रणासह जतन करून ठेवण्यात यावेत. मॉक ड्रिलसाठी स्थानिक अग्निशमन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
जास्त जोखीम असलेल्या भागात जास्तीत जास्त अग्निशामक यंत्रे लावण्यात यावीत. आग लागल्यास लिफ्टचा वापर करण्यात येऊ नये अशा ठळक सूचना लिफ्टच्या जवळ किंवा रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात याव्यात.प्रत्येक वॉर्डच्या ‘एक्झिट’ दरवाज्यासमोर कोणतीही अडगळ असू नये. परिसर मोकळा असावा याची दक्षता घ्यावी. रुग्णालयातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी आपत्कालीन मार्गाची सुविधा असावी. रुग्णालयात स्प्रिंकलर, फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर त्वरित बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी; तसेच जिल्हा नियोजन व बांधकाम विभागास पाठपुरावा करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.यानुसार आज आग प्रतिबंधक मॉक ड्रिल करण्यात आले.
याप्रसंगी डॉ धीरज चोखांद्रे,डॉ वाघमारे आदी उपस्थित होते