मुंबई – महाविकास आघाडी सरकारने व्हॅटच्या किमती कमी करून गॅसची किंमत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न करून उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेला दिलासा देतील का? असा थेट प्रश्न माजी मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात केला.
आमदार जयंत पाटील यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार राज्यातील गॅस दरवाढ व वीज प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
मागील वर्षभरात केंद्रसरकारने गॅस दरात सहा वेळा वाढ केली. व्यावसायिक गॅसचा भाव २११९ वर गेला तर घरगुती सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर गेली आहे. त्यामुळे घरोघरी चुली ही मागणी महाराष्ट्राची जनता आता करेल अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
विधानसभेचे अधिवेशन होईपर्यंत कृषी पंपांची वीजजोडणी तोडू नये, अशा सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आधीच वीजजोडण्या मिळत नाहीत. आता उपलब्ध असलेले कनेक्शन तोडण्याचे काम होत आहे. त्यामुळे राज्यातील कृषीपंपांची ४६ हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्यसरकारने तात्काळ माफ करावी, अशी आग्रही मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.