आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त जुहू किनाऱ्यावर स्वच्छता अभियान 

– स्वच्छता ही सवय बनावी -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

– समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब आहे. सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेले पाहिजे तसेच सागर किनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे, असे सांगून सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचे पूर्ण सहकार्य असेल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. राज्यातही ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला असून राज्यात 4500 ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याला 720 किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत. जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात. हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, पावसाळ्यानंतर ते नियमित सुरू राहणार असल्याचे सांगून यामुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, शासनाच्या सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया, असे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी जगभर जागृती अभियान राबविले जात आहे. देशात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमात सहभागी होऊन सर्वांनी किमान एक झाड लावावे, असे त्यांनी सांगितले. पाण्याच्या पुनर्प्रक्रिया करणाऱ्या स्टार्टअपसाठी केंद्र सरकार मार्फत मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

प्रधान सचिव दराडे यांनी समुद्र किनारा स्वच्छतेबाबत माहिती देऊन मुंबईतील सर्व चौपाट्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून स्वच्छ केल्या जात असल्याचे सांगितले. तर तन्मय कुमार यांनी केंद्र सरकार मार्फत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी किनारा स्वच्छतेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ढाकणे यांनी या अभियानात सहभागी सर्वांचे आभार व्यक्त केले.

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या साहाय्याने जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसची भूमिका सदैव आरक्षणविरोधी भाजपा खासदार विनोद चावडा यांची टीका

Sun Sep 22 , 2024
– मागास समाजाच्या उन्नती, विकासासाठी मोदी सरकार तत्पर मुंबई :- राहुल गांधी यांच्या अमेरिका दौ-यातील वक्तव्यावरून आरक्षण विरोधी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेसला मागास व अनुसूचित समाजाची उन्नती नको आहे. पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेस केवळ व्होटबँकेच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, अशी टीका भाजपा गुजरात प्रदेश महासचिव खा.विनोद चावडा यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलायात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com