सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात “करिअर अँड प्लेसमेंट सेल” तर्फे विद्यार्थ्यांकरिता भविष्यातील संधी अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पराग निमिशे होते. “विज्ञान स्नातक विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रम आणि नोकरी संधी” या विषयावर वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विलास डोईफोडे यांनी सादरीकरण केले. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जॅम, सी.यु.ई.टी. सारख्या प्रवेश परीक्षा देऊन आय. आय. टी आणि नामांकित केंद्रीय विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवावा असे प्रतिपादन केले. त्यासाठी आवश्यक माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी पुढील अभ्यासक्रम आणि करिअरचे नियोजन दहावी नंतर करायला सुरुवात केल्यास फायदा होतो त्याचप्रमाणे नियमित पदवी अभ्यासक्रमासोबत आवश्यक कौशल्य संपादित करावे असेही नमूद केले. याप्रसंगी उन्नती फौंडेशन चे वेदांत बोबडे यांनी रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. प्राचार्य निमिशे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले तसेच इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करिअर साठी करावा असेही आवाहन केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन प्लेसमेंट सेल चे प्रभारी प्रा. चंद्रशेखर पोटोडे यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला. करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विलास सोहगपुरे यांनी सहकार्य केले.