बेला :- राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव- बेला- सिरसी या जिल्हा मार्गावरील दहेली नजीकच्या वेना नदीवरील पुलास दहा पंधरा वर्षापासून कठडे नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कठड्याविना पूल असल्यामुळे पूरस्थितीत दहेलीचा हा पूल ओलांडणे म्हणजे जीवघेणा धोकादायक प्रवास ठरू शकतो. यासंदर्भात, मागील वर्षी पावसाळ्यात वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित झाली होती. मात्र, प्रशासनाने कठडे लावण्याची तसदी अद्याप पावतो घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर प्रवासी व जनता प्रचंड संताप व्यक्त करीत आहे.
नागपूर जिल्हा व उमरेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर बेला व शिरसी ही महत्त्वपूर्ण व मोठी गावे असून वेना नदीवर बेलानजीक निम्न लोवर वेना प्रकल्पाचे वडगाव जलाशय आहे. धरणा जवळच मानस ऍग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच आयडियल एनर्जी पावर प्लांट व बॉटलिंग प्लांट आहे. तसेच बेला येथे अप्पर तहसील कार्यालय सुद्धा आहे .मोठी बाजारपेठ व अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय असल्यामुळे बेला व सिरसी मार्गावर सोने गावचे राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. संततधार अतिवृष्टीत धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे वेणा नदीला पूर येतो. असा पूर बुधवारच्या मुसळधार पावसाने आला होता. दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते .अशावेळी पुलाखालून पुराचे पाणी वाहत असताना दहेलीचा वेना नदीचा पूल ओलांडणे अत्यंत धोक्याचे आहे. कठडे नसल्याने तो जीवघेणा प्रवासही ठरू शकतो. वारंवार नागरिकांकडून मागणी झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावर कठडे उभारले नाही. त्यामुळे जनता संतप्त होत आहे. किमान पावसाळ्यात कठडे असावे .अशी रास्त अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.