चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे – सुधीर मुनगंटीवार

Ø जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा

नागपूर :- चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन विभागाला दिल्या.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागांच्या प्रश्नांबाबत येथील हरीसिंग नाईक सभागृहात आयोजित बैठकीत मुनगंटीवार बोलत होते. अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, मृदू व जलसंधारणचे अधीक्षक अभियंता नितीन दुसाने, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे बैठकीला उपस्थित होते.

वनबाधित सिंचन प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिंचन व वनविभागाने विशेष बैठक घेवून वेगाने पूर्ण होऊ शकणाऱ्या निवडक प्रकल्पाची यादी तयार करावी व त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा. वन कायद्यामुळे 1983 पासून प्रलंबित असलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील हुमान नदी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीनुसार झालेला बदल लक्षात घेता या सिंचन प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गात खरोखरच अडचण येते का, यासंबंधीची तपासणी करण्यासाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नागपूर विभागात नवीन सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळण्यासाठी सिंचन अनुशेष तपासणीतील माजी मालगुजारी (मामा) तलाव यादीतून वगळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे अवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मृदा व जलसंधारण विभागाचा आढावा घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील 1678 पैकी 1100 मामा तलाव व गडचिरोली जिल्ह्यातील 1603 पैकी 475 मामा तलावांच्या दुरुस्ती कार्यक्रम राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दृष्काळसदृष परिस्थिती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनसाठी राखीव जिल्हा नियोजनचा पाच टक्के निधी मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी वापरण्याचे त्यांनी सांगितले. तलाव दुरूस्ती व बंधारे बांधकामात उच्च गुणवत्ता राखण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसायाठी मॉडेल जिल्हा म्हणून विकसित करावयाचा आहे. यासंबंधात विशेष बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले. मृद जलसंधारण महामंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यातील सुरू असलेले व प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात 151 योजनांच्या कामांमधून 11 हजार 658 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार असून गडचिरोली जिल्ह्यात 156 कामांतून सहा हजार 726 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती नितीन दुसाने यांनी सादर केली.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांधकामाधिन दिंडोरा बॅरेज, बेंडारा मध्यम प्रकल्प, हल्दी पुरानी, डोंगरगाव, कोटगल बॅरेज, तळोधी मोकासा, चिंचडोह बॅरेज, कोटगल उपसा सिंचन तसेच वनबाधीत प्रकल्पांतर्गत हुमन, तुलतुली ,चेन्ना नदी,कारवाफा, उमीनाला, डुरकानगुड्रा पुलखल आदी प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.

बैठकीला वन, जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली वस्त्रोद्योग व्यापाऱ्यांसोबत चर्चा

Sat Sep 2 , 2023
– प्रस्तावित व्यापारी संकुलाचे प्रेझेंटेशन : सूचना पाठविण्याचे आवाहन नागपूर :- गणेशपेठ येथील प्रस्तावित वस्त्रोद्योग संकुलाच्या (टेक्स्टाईल कॉम्प्लेक्स) संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) नागपुरातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. या संकुलाच्या संदर्भात व्यापाऱ्यांना सूचना मागविण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये संकुलाच्या संकल्पचित्राचे प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी, जिल्हाधिकारी डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!