नागपूर :- कामाच्या निर्धारित वेळत अनुपस्थित राहणे, निर्धारित वेळेपूर्वीच ओपीडी बंद करणे, मनपा यूपीएचसीमध्ये येणा-या रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात बोलावून आर्थिक लुबाडणूक करणे, मनपाची औषधे स्वत:च्या दवाखान्यात वापरणे, मिटिंगच्या नावाखाली रुग्णालयातून निघून जाणे आणि इतर कर्मचा-यांना रुग्णांस औषध देण्यास सांगणे हा सर्व प्रताप नागपूर महानगरपालिकेच्या विजय नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (यूपीएचसी) कार्यरत वैद्यकीय अधिका-याचा असून या अधिका-याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांना केली आहे.
ॲड. मेश्राम यांनी सदर निवेदनाची प्रत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना देखील पाठवली आहे.
निवेदनामध्ये ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले की, नागपूर महानगरपालिकेच्या विजय नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (यूपीएचसी) वैद्यकीय अधिकारी डॉ. रिकी देवगडे यांच्यासह इतर कर्मचा-यांच्या कामाची वेळ ही सकाळी ८ ते सायंकाळी ४ ही असून या केंद्रातील सर्व कर्मचारी १० वाजता येतात. २ वाजतापर्यंत ओपीडीची वेळ असतानाही १२ वाजताच ओपीडी बंद करण्यात येते. याबद्दल जाब विचारल्यास नागरिकांना अरेरावीच्या भाषेत उत्तर दिले जाते. विजय नगर यूपीएचसी मध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे अधिकार नसतानाही रुग्णांना बाहेरील औषध लिहून देतात व उपचारासाठी स्वत:च्या खासगी दवाखान्यामध्ये बोलावतात. वैद्यकीय अधिकारी मनपाच्या दवाखान्यातील औषध स्वत:च्या खासगी दवाखान्यामध्ये वापरत असल्यामुळे यूपीएचसीमध्ये रुग्णांना औषधे अपुरे पडत असल्याचा आरोप ॲड. मेश्राम यांनी निवेदनामध्ये केला आहे.
विजय नगर यूपीएचसीमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. रिकी देवगडे यांचेकडून रुग्णांसोबतच दुर्व्यवहार केला जातो. रुग्णालयातील औषध तसेच उपचाराबाबत विचारणा केल्यास अरेरावी केली जात असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. सदर वैद्यकीय अधिका-याच्या सेवा तात्काळ विखंडित करून दुसरे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची देखील मागणी स्थानिक नागरिकांद्वारे केली जात असल्याचेही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले आहे. विजय नगर यूपीएचसीमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी हा मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या मित्राचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न डॉ. बहिरवार करीत असल्याच्या आरोपाची तक्रार देखील प्राप्त झाल्याची माहिती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकामध्ये दिली आहे.
सदर वैद्यकीय अधिकारी मिटिंगच्या नावाखाली १२ वाजता यूपीएचसी मधून निघून जातात व इतर कर्मचारी रुग्णांना औषधे देतात. रुग्णांच्या जीवाशी हा सर्सास खेळ असून नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या बेजबाबदार वैद्यकीय अधिका-याची सखोल चौकशी करून कारवाई करावी. तसेच या वैद्यकीय अधिका-याला कुठल्या वरिष्ठ अधिका-याचे अभय आहे का? याची देखील चौकशी करावी व अशा अधिका-यांना अभय देणा-या वरिष्ठांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.