– महिलांनी अधिक सक्षम होण्याची गरज – प्रा. वैशाली नांदुरकर
अमरावती :-आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करित आहेत. पण अजुनही महिलांना पाहीजे तसा सन्मान व दर्जा आणि समानता समाजात मिळालेली नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली जातील व महिला अधिक सक्षम होतील असे मत प्रा. वैशाली नांदुरकर यांनी व्यक्त केले. शहरातील पारिजात कॉलनी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, यावेळी त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर योगगुरू डॉ. वंदना पराते, विदर्भ कुंभार समाज महिला अध्यक्ष प्रभाताई भागवत, समाजोन्नती समितीचे प्रा. सुरेश नांदुरकर,निर्मला नांदुरकर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्रा. नांदुरकर पुढे म्हणाल्या, चुल आणि मुल ही सुरूवातीला महिलांच्या बाबतीत पुरूष प्रधान संस्कृतीत व्याख्या होती. महिलांच्या उत्थानासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजविलं. सावित्रीबार्इंच्या पुण्याईने आमच्या महिलांना शिक्षणाची दारे उघडली. आज स्त्रीया सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. भारताची राष्ट्रपती स्त्री असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगून उपस्थितांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
योगगुरू डॉ. वंदना पराते यांना सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रभाताई भागवत म्हणाल्या, कुंभार समाजातील महिलांना एकत्रित आणण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य झिजविलं. घरातच राहणाया आमच्या भगिनींना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कुंभार समाजातील महिला सक्षम बनत असल्याचा अभिमान वाटते असे त्या म्हणाल्यात.
प्रा. सुरेश नांदुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन निर्मला नांदुरकर यांनी तर आभार आढवले यांनी मानले. यावेळी कुंभार समाजातील महिला तसेच पारिजात कॉलनीतील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.