– प्रत्येकच दिवस महिला दिवस म्हणून साजरा व्हावा – प्राजक्ता लवंगारे-वर्मा
– विभागीय आयुक्त कार्यालयात महिला दिन उत्साहात
नागपूर, दि. 8 : समाजाने महिलांना पाठबळ दिल्यास स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. यामुळे केवळ एका दिवसासाठी ‘महिला दिन’साजरा न करता प्रत्येकच दिवस महिला दिन म्हणून साजरा व्हावा. तेव्हा खरे तर ‘ब्रेक द बायस’ हे घोष वाक्य खरे ठरेल. असा विश्वास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्राजक्ता लवंगारे-वर्मा बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, वस्त्रोद्योग आयुक्त शितल तेली-उगले, रोजगार हमी योजना उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त आशा पठाण, पुनर्वसन उपायुक्त रेश्मा माळी, विकास उपायुक्त मंजुषा ठवकर, गुप्तवार्ता विभाग उपायुक्त रश्मी नांदेडकर, नगररचना सहसंचालक सुप्रिया थूल, रोजगार हमी योजनेच्या सहायक लेखाधिकारी आरती राठोड आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
महिला दिवस साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. हा हक्काचा दिवस मिळावा, महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने समान स्थान मिळावे यासाठी जगभरातील महिलांनी पुकारलेल्या लढ्याचे हे यश आहे, असे सांगून प्राजक्ता लवंगारे-वर्मा म्हणाल्या, स्त्रियांनी संघटित होऊन कार्य करावे. कार्यालयातील महिलांनी संघभावनेने काम केल्यास आनंदी वातावरण निर्माण होऊन कामाच्या परिणामकारकतेवरही सकारात्मक बदल घडून येतो. असे त्या यावेळी म्हणाल्या.
स्त्रियांना आयुष्यात विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जावे लागते. यासाठी स्त्रियांनी भावनांचा कोंडमारा होऊ न देता मनातील विचारांचा निचरा वेळोवेळी होवू द्यावा. त्यांनी संवादी बनावे. यासाठी आप्त-स्वकीय आणि मैत्रिणींची मदत घ्यावी. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची समस्या अधिक आत्मियतेने समजू शकते. स्त्रियांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात. असे सांगून प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विविध कलागुण सादर केलेल्या महिलांचे यावेळी कौतुक केले.
आर. विमला म्हणाल्या की, पाठिंबा ही स्त्रियांची खरी शक्ती आहे. पती आणि पत्नी दोघेही संसार रथाचे चाके आहेत. यामुळे संसाराची जबाबदारी पत्नीप्रमाणे पतीनेही घेणे गरजेचे आहे. कार्यालयीन कामकाजाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ न शकल्याबद्दल स्त्रियांनी स्वत:मध्ये अपराधीपणाची भावना जोपासू नये. स्वत:चे आयुष्य फुलविण्यालाही संधी द्यावी. विविध छंद, कलागुण जोपासून मनापासून आयुष्य जगावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
स्त्रीमुक्तीचे संस्कार आपल्या घरापासून सुरु करा. असे आवाहन करत तेली-उगले म्हणाल्या की, स्त्रियांना समाजात दुय्यम लिंग म्हणून मिळणाऱ्या वागणुकीचे संस्कार खरे तर घरापासूनच होतात. यासाठी स्त्रियांनी आपल्या मुलांचे संगोपन करताना स्त्री-पुरुष समानतेची बीजे रोवावी. मुले घडविताना आईचे संस्कार पाल्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. उद्याचा सक्षम आणि सुदृढ विचारांचा समाज बनविण्याची जबाबदारी स्त्रियांची आहे. स्त्रियांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे. कारण एक स्त्री आजारी पडल्यास खऱ्या अर्थाने घरही आजारी पडते. यासाठी स्त्रियांनी स्वत:च्या आरोग्यासाठी ठराविक वेळ निश्चितच काढावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करुन माँ जिजाऊ, राणी अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ती आशा पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार सारिका रासकर यांनी तर आभार राजलक्ष्मी शहा यांनी मानले.