– संस्कार भारतीच्या नाट्य महोत्सवाचा समारोप
नागपूर :- वर्तमानात इतिहासाचे चिंतन केले तर भविष्याची प्रेरणा मिळत असते. क्रांतीगाथा या नाट्य महोत्सवातून नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
संस्कार भारती आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘क्रांतीगाथा’ या बहुभाषिक नाट्य महोत्सवाचा आज समारोप झाला. यावेळी ना. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा. कमला भोंडे, नागपूर महानगर अध्यक्ष कांचन गडकरी, प्रमोद पवार, अक्षय वाघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले.
त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संस्कार भारतीने सर्व भारतीय भाषांचा नाट्य महोत्सव आयोजित करून हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.’ आपल्या देशात वैविध्य आहे आणि तेच आपले वैशिष्ट्य देखील आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती याचे भारतासोबत संपूर्ण जगाला आकर्षण आहे, असेही ते म्हणाले. सांस्कृतिक मूल्य जोपासल्याने व्यक्तिनिर्माणाच्या कार्याला गती मिळते, असे सांगून ना.गडकरी म्हणाले, ‘संगीत, नृत्य, नाट्य, साहित्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो.
काही दिवसांपूर्वी कल्याणेश्वर मंदिरात दोनशेहून अधिक कलावंतांनी शास्त्रीय गायन केले. यामध्ये डॉक्टर, वकील आदींचा समावेश होता. कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी, दिवसभर रुग्ण तपासताना निर्माण होणारी नकारात्मकता संगितामुळे नाहिशी होते आणि कामाची प्रेरणा मिळते, असे सांगितले. क्रांतीगाथा नाट्य महोत्सवातून स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रभक्ती बघताना आपल्यात सकारात्मकता निर्माण झाली असेल असा मला विश्वास आहे.’