- जिल्हाधिकारी आर. विमला यांची सूचना
- 2022-23 कौशल्य धोरणासाठी बैठक
- जिल्ह्यातील औद्योगिक संघटना सहभागी
- निराधार महिलांच्या कौशल्याकडे लक्ष वेधणार
नागपूर – नागपूर जिल्ह्याचे पुढील वर्षाचे कौशल्य विकासाचे धोरण ठरविताना स्थानिक उद्योग समूहाच्या आवश्यकता लक्षात घ्या. त्यांना उपयुक्त ठरेल, असे कुशल मनुष्यबळ निर्मिती धोरण ठरले पाहिजे. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांनाच कोणत्याही परिस्थितीत आस्थापनांवर रोजगार मिळाला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे केल्या.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांच्या आयोजनात नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार कौशल्य विकास आराखडा तयार करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅनिफॅक्चर असोसिएशन, याशिवाय वेगवेगळ्या औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी तसेच रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण संबंधातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सर्व विभाग प्रमुख तसेच औद्योगिक आस्थापनांच्या गरजा आवश्यकता आणि उपलब्धता यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी शासकीय यंत्रणेतून प्रशिक्षित झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना, महिलांना, प्राधान्याने सर्व आस्थापनांमध्ये आवश्यक तो रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जनसंपर्क ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे,याचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करून अल्पमुदतीचे अभ्यासक्रम तयार करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध औद्योगिक आस्थापनांनी देखील ट्रेनिंग पार्टनर म्हणून पुढे यावे, जेणेकरून औद्योगिक आस्थापनेवर दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होईल. कुशल मनुष्यबळ निर्माण झाल्याचा औद्योगिक आस्थापनांची मनुष्यबळाची गरज देखील पूर्ण होईल. त्यासाठी जिल्हा कार्यालयांनी औद्योगिक आस्थापनांना आवश्यक ती सर्व मदत, सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कौशल्य प्रमाणपत्र उमेदवारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करावेत, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यापुढे औद्योगिक आस्थापना व कौशल्य विकास विभाग यांनी एकत्रितपणे एकमेकांच्या सहकार्याने कार्य करावे, जेणेकरून स्थानिक उमेदवारांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी भविष्यात प्राप्त होतील, अशी सूचना त्यांनी केली.
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना कौशल प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षणात अधिक संधी उपलब्ध करणे, जिल्ह्यातील मनुष्यबळाच्या मागणीनुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा कौशल्य विकास आराखडा तयार करणे, औद्योगिक आस्थापनांना कौशल विकास कार्यक्रमांमध्ये समावेश करून घेण्यासाठी त्यांची स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणी करणे, याबाबतच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्र.ग.हरडे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन सोळंकी, महिला व बालकल्याण विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरी अनिता राव, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे प्रशांत मेश्राम व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन महात्मा गांधी नॅशनल फेलो मनीष कुदळे यांनी केले.