मतदार नोंदणीसाठी औद्योगिक आस्थापना व कामगार संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

Ø ‘मतदार नोंदणी संक्षिप्त पुनर्रिक्षण मोहिम’अंतर्गत विशेष अभियान

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातून ७५ हजार नवमतदारांची नोंदणी करायची असून या राष्ट्रीय कर्तव्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. हिंगणा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत विविध उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते सफाई कामगार पर्यंतची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी औद्योगिक आस्थापना व कामगार संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

निवडणूक विभागाद्वारे मतदार नोंदणीसाठी ‘मिशन युवा इन’ व ‘मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण’ मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आय.एम.ए.) सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण माहीरे, आय.एम.ए. चे अध्यक्ष कॅप्टन सी.एम. रणधीर व सचिव पी. मोहन, हिंगणाच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर व एमआयडीसीचे परिसरातील विविध कंपन्यांचे प्रतीनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योगातील कामगारांची नोंद मतदार यादीत झाली अथवा नाही याची खातरजमा करावी. त्यासाठी कामगारांना मदतीस घेवून आग्रही भूमिका ठेवावी. जिल्ह्याचा निवडणूक विभाग औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांना मदत करेल, औद्योगिक वसाहतीत परप्रांतासह इतर जिल्ह्यातील कामगार रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. हे कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी आज दिल्या.

वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी आता जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि सप्टेंबर महिन्यात एक तारखेला असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नवमतदार नोंदणीसाठी नमुना-सहा, नाव कमी करण्यासाठी नमुना-सात तर मतदार संघात नाव स्थानांतरित किंवा कोणतेही बदल वा सुधारणा करण्यासाठी नमुना-आठ चा अर्ज भरून द्यावा. मतदार नोंदणीची कार्यवाही जलद करण्यासाठी ‘व्होटर हेल्पलाईन’ या ऑनलाईन मोबाईलॲप चा वापर करण्याच्या सूचना डॉ. इटनकर यांनी यावेळी दिल्या.

उपजिल्हाधिकारी महीरे यांनी हिंगणा औद्योगिक वसाहतीत मतदार नोंदणी सुलभ करण्यासाठी निवडणूक विभागातर्फे आएमएच्या सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात मतदार नोंदणी सुविधा केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.

निवडणूक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असून जी मंडळी वर्षानुवर्षे या ठिकाणी काम करतात त्यांचे मतदार कार्ड स्थानिक स्तरावर तयार करणे आवश्यक आहे. मात्र असे करताना या कामगारांना पुन्हा अन्यत्र गेल्यानंतर तेथील मतदार यादीतून नाव काढून ज्या ठिकाणी बदलून गेले तेथे नोंद करता येते, हे सांगणे देखील आवश्यक आहे. ज्या ठिकाणी रहिवास असेल त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट होणे गरजेचे असून लोकशाही व्यवस्थेमध्ये आपला मताचा अधिकार बजावणे आवश्यक असल्याचे कामगारांना उद्योजकांनी समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बैठकीला निवडणूक विभाग व एम.आय.डी.सी. हिंगणाचे अधिकारी तसेच विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विविध मागण्यांसाठी निवेदने

Mon Aug 21 , 2023
– जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज (रविवारी) जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदने देतानाच वैद्यकीय, रस्ते सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण कल्पनाही मांडल्या. खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह मोठी गर्दी केली. सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित होते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश होता. नवीन रस्ते, अनुकंपा तत्वावरील नोकरी, शाळेतील प्रवेश, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com