– नागरिकांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतार्थ काढली शोभायात्रा
नागपूर :- तब्बल पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर संपूर्ण भारतासाठीचे सुवर्ण दिन उगविला आणि सोमवार २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम आयोध्येत मूर्तीरूपात अवतरले, हा संपूर्ण विश्वासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात रामललाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. याचे औचित्यसाधून संत्रानगरीही भगव्या रंगाने उजळून निघाली. शहरातील इंद्रप्रस्थनगर परिसरही “जय जय श्री राम”च्या जयघोषाने दुमदुमले.
इंद्रप्रस्थनगर परिसरातील नागरिकांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या स्वागतार्थ शोभायात्रा काढली.
शोभायात्रेचा प्रारंभ २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास इंद्रप्रस्थनगर येथील अमर आशा सोसायटीतील शिव मंदिरातून झाला. शोभायात्रेसाठी दारोदारी रांगोळ्या, तोरण, फुलांनी परिसर सुशोभित करण्यात आला होता.
प्रभू रामचंद्रांचे विविध भक्तिगीते, “श्री राम, जय राम, जय जय राम” चे घोष अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी उत्स्फूर्तने म्हटले. श्रीराम म्हणून ध्रुव त्रिवेदी, लक्ष्मण – श्रीनाथ मेहेर, सीता – दिव्यांका भुयार, हनुमान – रोहित यांनी वेशभूषा साकारून शोभायात्रा अधिक आकर्षक बनवली. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या देखाव्याची सुंदर भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
सगळया नागरिकांच्या भावना प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तिमय वातावरणात शंखनाद आणि टाळच्या गजरात ओतप्रोत झाल्या होत्या. शोभायात्रेची सांगता आरतीने झाली. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेपर्यंत भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. त्यानंतर अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा भव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचा नागरिकांनी भरभरून आनंद लुटला. इंद्रप्रस्थनगर येथील अमर आशा सोसायटी येथे शिव मंदिरात गेल्या १५ दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.