भारताच्या जी-20 अध्यक्षीय कार्यकाळाचा आज प्रारंभ – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली:- जी-20 संघटनेच्या यापूर्वीच्या 17 अध्यक्षांच्या कार्यकाळात बृहद- आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय करआकारणी तर्कसंगत करणे, देशांवरील कर्जाचा बोजा कमी करणे असे आणखी अनेक उत्तम परिणाम दिसून आले. आपल्याला या कामगिरींचा लाभ होईल आणि या पायावर आपण आणखी चांगली कामगिरी करू.

मात्र, ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी भारत स्वीकारत असताना, मी स्वतःलाच विचारतो- जी-20 ला आणखी पुढे जाता येईल का? आपण समस्त मानवजमातीला लाभ देण्यासाठी मूलभूत मानसिकतेमधील बदलाला चालना देऊ शकतो का?

मला असे वाटते की आपल्याला हे शक्य आहे.

आपल्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आपली मानसिकता तयार होते. आपल्या संपूर्ण इतिहासात मानवतेला अतिशय टंचाईला तोंड द्यावे लागले. मर्यादित संसाधनांसाठी आपण संघर्ष केला कारण दुसऱ्याला ती संसाधने नाकारण्यावर आपले अस्तित्व अवलंबून होते. कल्पना, विचारसरणी आणि ओळख यासाठी संघर्ष आणि स्पर्धा हेच निकष बनले होते.

दुर्दैवाने आजही आपण एकाचा तोटा तो दुसऱ्याचा लाभ या शून्य बेरजेच्या मानसिकतेमध्ये अडकून पडलो आहोत. ज्यावेळी काही भूभाग किंवा संसाधनांच्या मालकीवरून देश संघर्ष करत असताना आपल्याला या मानसिकतेचे दर्शन घडते. अब्जावधी लोकांना धोका असतानाही काही मोजक्या लोकांकडून लसींची साठेबाजी केली जाते तेव्हा आपल्याला ही वृत्ती दिसते. संघर्ष आणि हाव हा मानवी स्वभावच आहे असा युक्तिवाद काही जण करतील. मी याच्याशी सहमत नाही. जर मानव पूर्वीपासूनच स्वार्थी असता तर अनेक आध्यात्मिक परंपरांच्या आपण सर्व एक आहोत या मूलभूत शिकवणुकीचा अर्थ काय?

अशाच प्रकारची एक परंपरा भारतात लोकप्रिय आहे, ज्या अंतर्गत केवळ सर्व सजीवच नव्हेत तर निर्जिव वस्तूदेखील पाच मूलभूत तत्वांपासून- म्हणजे भूमी,जल, अग्नि, वायू आणि आकाश या पंच तत्वांपासून बनल्या आहेत, अशी धारणा आहे. भौतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी आपल्यात, परस्परांमध्ये या तत्त्वांमधील संतुलन आवश्यक आहे.

भारताच्या जी-20 अध्यक्षीय कार्यकाळात एकतेच्या सार्वत्रिक भावनेला चालना देण्यासाठी काम करण्यात येईल. म्हणूनच ‘ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आपलं घोषवाक्य असेल.

हे केवळ एक घोषवाक्य नाही. मानवी परिस्थितीमध्ये अलीकडच्या काळात झालेले बदल ज्यांची एकत्रितपणे दखल घेण्यात आपण कमी पडलो, त्यांचा विचार यामध्ये आहे. जगामधल्या सर्वांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकेल इतके उत्पादन करण्याची साधने आपल्याकडे आहेत.

आज आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची गरज नाही- आपले हे युग युद्धाचे युग बनण्याची गरज नाही. प्रत्यक्षात ते असे असूच नये.

आज आपल्यासमोर हवामान बदल, दहशतवाद आणि महामारी यांसारखी अनेक महाकाय आव्हाने आहेत आणि त्यांचे निराकरण एकमेकांशी लढून नव्हे तर एकमेकांसोबत काम करून होणार आहे.

सुदैवाने आजचे तंत्रज्ञान आपल्याला मानवतेच्या व्यापक पातळीवर या समस्या सोडवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आपण ज्यात राहात आहोत अशी अतिशय विशाल आभासी विश्वे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मापनक्षमतेची प्रचिती देत आहेत.

जगातील  एकूण लोकसंख्येच्या   एक षष्ठांश जणांचा निवारा असलेला , भाषा, धर्म, रूढी, चालीरीती आणि श्रद्धा यांचे अफाट वैविध्य असलेला भारत हा जगाची सूक्ष्म प्रतिकृती आहे.

सामूहिक निर्णय घेणारी सर्वात  प्राचीन ज्ञात परंपरांची संस्कृती या नात्याने  भारताचे लोकशाहीच्या गुणसूत्रांमध्ये लक्षणीय योगदान आहे.  लोकशाहीची जननी असलेल्या भारतात राष्ट्रीय स्तरावरील सहमती ही हुकुमशाहीने नव्हे तर  करोडो  मुक्त आवाज एका कर्णमधुर  रागात मिसळून तयार झालेल्या सुरावटीप्रमाणे होते.

आज, भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आमचे नागरिक केंद्रित शासन एकाचवेळी आमच्या प्रतिभावंत युवापिढीच्या  सर्जनशील, कल्पक  प्रतिभेला दिशा दाखवते तर त्याचवेळी  समाजातील अत्यंत दुर्बल घटकातील नागरिकांची देखील काळजी घेते.

आम्ही राष्ट्राचा विकास  केवळ सरकारी पातळीवरील  एक उपचार म्हणून न समजता , त्याला नागरिकांच्या नेतृत्वाखालील ‘जन चळवळीचे ‘ स्वरूप देण्याचा  प्रयत्न केला आहे.

आम्ही तंत्रज्ञानाचा लाभ मुक्त, सर्वसमावेशक आणि एकमेकांशी निगडित असलेल्या सार्वजनिक सेवांना डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी घेतला आहे. यामुळे सामाजिक संरक्षण, वित्तीय समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणारे व्यवहार या सर्वच आघाड्यांवर क्रांतिकारी प्रगती साध्य झाली  आहे.

या सर्व कारणांमुळेच भारताचा प्रदीर्घ अनुभव जागतिक समस्यांवर संभाव्य  उपाय शोधण्यासाठी अंतर्दृष्टी प्रदान करू शकतो.

आमच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कालखंडात भारताचे अनुभव, शिकवण आणि आदर्शांना इतरांसाठी, विशेषतः विकसनशील जगासाठी मार्गदर्शक दस्तऐवज म्हणून आम्ही सादर करू.

आमचे  जी 20 चे प्राधान्यक्रम केवळ  जी 20 च्या सदस्य राष्ट्रांसोबतच्या विचारविनिमयाअंती ठरवले  जाणार नाहीत तर ज्यांचा आवाज अनेकदा ऐकू येत नाही अशा आमच्या सहप्रवासी दक्षिणेकडील राष्ट्रांशी चर्चा करून निश्चित  केले जातील.

आमची प्राथमिकता आपली सर्वांची  ‘एक पृथ्वी’ अधिक उत्तम करण्यावर  केंद्रित असेल, आपल्या ‘एका कुटुंबात’ सुसंवाद वाढवण्यावर असेल आणि आपल्या ‘एकत्रित भविष्याला’ आशेचा किरण दाखवण्यावर असेल.

आपल्या ग्रहाला सुखावह बनवण्यासाठी, आम्ही निसर्गावर  विश्वास ठेवण्याच्या भारताच्या परंपरेवर आधारित शाश्वत आणि पर्यावरण स्नेही अशा  अनुकूल जीवनशैलीला प्रोत्साहन देऊ.

मानवजातीच्या या एकत्र कुटुंबात सौहार्द्र वाढावे यासाठी अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादनांच्या जागतिक पुरवठ्याला  राजकीय  परिभाषेत मोजले जाऊ  नये यासाठी आम्ही प्रयत्न करू जेणेकरून भूराजकीय  तणावामुळे मानवतावादी संकटे उद्भवू नयेत. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबात ज्याच्या गरजा अधिक निकडीच्या असतात, त्यांच्या प्रति नेहमीच सर्वात आधी काळजी घेतली जाते,

आमच्या भावी पिढ्यांमध्ये भविष्यासाठी सकारात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने आशा जागृत करण्यासाठी, सामूहिक विनाशकारी  शस्त्रांमुळे निर्माण होणारे धोके कमी करणे आणि जागतिक सुरक्षा वाढवणे यासाठी आम्ही सर्वात शक्तिशाली देशांमध्ये  प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन देऊ.

भारताचा  जी 20 अजेंडा  सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती-केंद्रित आणि निर्णायक असेल.

भारताचे जी 20 चे अध्यक्षपद , संरक्षण,  सद्भाव आणि  आशा यांचे अध्यक्षपद व्हावे, याकरता आपण एकत्र येऊ या.

मानव-केंद्रित जागतिकीकरणाचा एक नवीन आदर्श साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करू या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारताच्‍या जी 20 अध्‍यक्षपदाच्‍या कार्यकाळाला आजपासून सुरुवात होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी ब्लॉग द्वारे व्यक्त केले मनोगत

Fri Dec 2 , 2022
नवी दिल्‍ली :-“भारताचे जी-20 चे अध्यक्षपद संरक्षण, सद्भाव आणि आशा यांचे अध्यक्षपद व्हावे, याकरता आपण एकत्र येऊ या” भारत आज जी-20 चे अध्यक्षपद ग्रहण करतभारताच्‍या जी 20 अध्‍यक्षपदाच्‍या कार्यकाळाला आजपासून सुरुवात होत असून या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगद्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे : ‘भारत जी-20 चे अध्यक्षपद ग्रहण करत असताना पंतप्रधानांनी  ब्लॉग द्वारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!