नागपूर : मूळ नागपूरकर मेजर जनरल नितीन राम इंदुरकर यांना भारतीय सेनेचे यावर्षीचे विशिष्ट सेवा मेडल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित होऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची परीक्षा उत्तीर्ण करून 1986 मध्ये ते भारतीय सैन्यात सेकंड-लेफ्टनंट या पदावर रुजू झाले. आपल्या कार्य, कौशल्य आणि कर्तृत्वावर ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले. सध्या ते ECHS विभागाचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून दिल्ली येथे कार्यरत आहे. जम्मू काश्मीरच्या संदर्भातून झालेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. यापूर्वी नितीन यांनी उत्तर पूर्व भागातील अरुणाचल, मणिपूर, नागालँड, पंजाब मधील गुरुदासपूर, फिरोजपुर, जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावली आहे.
कांगो येथील शांती सेनेचे प्रमुख म्हणूनही त्यांनीं यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. नितीन हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्त मुख्य वनसंरक्षक राम नारायण व पुष्पा राम इंदुरकर यांचे ज्येष्ठ पुत्र आहे. एन ओ बी डब्ल्यूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विनायक आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक इंदुरकर हे त्यांचे चुलत बंधू होत. नितीन यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल चाहते मित्र व कुटुंबियांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.