– खाण क्षेत्राने 2026-27 पर्यंत राष्ट्रीय स्थूल उत्पादना मध्ये किमान 2.5% योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी
इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या नागपूर येथे 75 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रल्हाद जोशी यांनी केले संबोधित
नागपूर :-भारत खाण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यांनी आज व्यक्त केली. अधिक खाण अन्वेषण साध्य करण्यासाठी आपण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सर्वोत्तम जागतिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. भारताने थर्मल कोळशाची आयात शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी देशातील एकूण कोळसा उत्पादन सुमारे 900 दशलक्ष टन असेल तर पुढील वर्षी एकट्या कोल इंडिया लिमिटेडद्वारे 1 अब्ज टन कोळसा निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. प्रल्हाद जोशी आज नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या सभागृहात इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. इंडियन ब्युरो ऑफ माईन्सची स्थापना 1 मार्च 1948 रोजी नागपुरातील सिव्हिल लाईन्स झाली असून ही संस्था आपला 75 वा वर्धापन दिन ‘खनीज दिवस’ म्हणून साजरा करत आहे. खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया, खाण नियंत्रक, आयबीएम, नागपूर, पी.एन. शर्मा या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
खाण क्षेत्रात आणलेल्या विविध सुधारणांवर भर देताना खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, मंत्रालयाने खनिज सवलतीतील 49 नियम आणि खनिज संवर्धन आणि विकासातील 24 नियमांचे गुन्हेगारी स्वरुप रद्द केले आहेत. ते म्हणाले, आम्हाला आमच्या लोकांवर विश्वास ठेवायचा आहे. त्यांनी माहिती दिली की, लिलाव पद्धती सुरू झाल्यापासून 2015 पासून आतापर्यंत 239 खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला आहे. 2021 नंतर, 131 खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला आहे. राज्य सरकारे आणि उद्योगसमुह तसेच संबंधित हितधारकांच्या मदतीने हे खनिज ब्लॉक्स 5 वर्षांत कार्यान्वित करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
आयबीएम, नागपूर 75 वा वर्धापन दिन साजरा करत असताना मंत्री महोदयांनी आवाहन केले की, 2047 मध्ये भारताचे खाण क्षेत्र कसे असावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खनिजे हे राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. खाण क्षेत्राने 2026-27 पर्यंत GDP मध्ये किमान 2.5% योगदान देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. जीडीपी योगदानाचे हे लक्ष्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या गुंतवणूक आणि उद्योग अनुकूल बदलांनी साध्य केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज म्हणाले की, कॅनडा, दक्षिण आफ्रिकेसारख्या विकसित देशांमध्येही भारताकडे उपलब्ध असलेली मायनिंग टेनमेंट सिस्टिम अनुपलब्ध आहे. आयबीएमच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय खाण ब्युरोने आंतरराष्ट्रीय मानके साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आंतरराष्ट्रीय खाण ब्युरो बनण्याचे उद्दिष्ट ठेवावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया यांनी आयबीएमच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की आयबीएम ही संस्था खाण क्षेत्राचे नियंत्रक , खाण माहितीचा कोश तसेच शाश्वत आणि वैज्ञानिक खाणकामासाठी देखील मानक प्रस्थापित करण्याचे काम करत आहे . आयबीएम आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – नीरी नागपूर यांनी लॅटिन अमेरिकेतील अल-साल्व्हाडोर देशातील निष्क्रीय, वापरात नसलेल्या खाणी वैज्ञानिकदृष्ट्या बंद करण्यासाठी संयुक्त संशोधन केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खाणकामातील सर्वोत्तम पद्धती अवलंबल्याबद्दल पंचतारांकित मानांकन मिळालेल्या एकूण 76 खाणींचा या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पी.एन.शर्मा, खाण नियंत्रक, आयबीएम , नागपूर यांनी 75 व्या खनीज दिवसानिमित्त स्वागतपर भाषण केले. आयबीएम नागपूरच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
तत्पूर्वी , खाण मंत्रालयाचे सचिव, विवेक भारद्वाज, यांनी विविध खाण/खनिज संस्थांनी या ठिकाणी लावलेल्या स्टॉल्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सकाळच्या सत्राची सुरुवात आयबीएमच्या गेल्या 75 वर्षांच्या प्रवासावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली. त्यानंतर “खाण कंपन्यांच्या सर्वोत्तम पद्धती” आणि “खाण योजना आणि ड्रोन सर्वेक्षण” या विषयावर सादरीकरण करण्यात आले. प्रदर्शनात खनिजे, धातू, धातूंचे विविध मॉडेल्स ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एनएमडीसी, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड – सेल, मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड-एमईसीएल सारख्या सार्वजनिक उपक्रमांचे स्टॉल लावण्यात आले होते. खनीज दिनानिमित्त लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही भेट दिली .या प्रदर्शनाला खनिज उद्योगातील प्रतिनिधींनी भेट दिली .
या कार्यक्रमात खाण आणि खनिजे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील खाण कंपन्यांशी संबंधित अनेक केंद्रीय आणि राज्य विभागातील मान्यवर उपस्थित होते.